पर्यावरणात वाघांचं अस्तित्व किती महत्त्वाचं? जैवविविधतेला धोका की वरदान? वाचा सविस्तर
भारतीय वाघांचे संरक्षण केवळ या भव्य प्राण्याच्या अस्तित्वाचे नव्हे, तर जंगल, जैवविविधता आणि पर्यावरण या त्याच्या संपूर्ण अधिवासाच्या संतुलनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वाघाच्या मुख्य अन्नसाखळीतील प्राणी म्हणजेच हरिण, डुकरं, नीलगाय, गौर (भारतीय बिसन) व इतर खुरधारी प्राण्यांच्या संख्येत काही राज्यांमध्ये घट झालेली आहे, यामुळे वाघांच्या अस्तित्वासोबतच जंगलांचं आरोग्यही धोक्यात आलं आल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
World Environment Day 2025: पृथ्वीच्या आरोग्याला प्लास्टिकपासून निर्माण झाला धोका; वाचा विशेष लेख
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) आणि वन्यजीव संस्था भारत (WII) यांनी २०२२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय वाघ मोजणीच्या (Tiger Census) डेटा आधारे एक सखोल अभ्यास केला. यात देशभरातील विविध जंगलांमधील खुरधारी प्राण्यांचे प्रमाण, वितरण आणि त्यांच्या अधिवासाचे आरोग्य याचा अभ्यास करण्यात आला आहे. मुख्य अन्नसाखळीतील प्राण्यांमध्ये चितळ (हरिण), सांबर, गौर यांचा समावेश होतो. चितळ हा सर्वाधिक संख्येने आढळणारा प्राणी असून तो विविध अधिवासांमध्ये सहजगत्या तग धरतो. सांबर देखील बऱ्याच भागात स्थिर स्थितीत आहे, तर गौर मुख्यतः पश्चिम घाट व मध्य भारतात आढळतो. उत्तराखंड, पश्चिम घाट, मध्य भारत आणि ईशान्य भारतातील जंगलांमध्ये खुरधारी प्राण्यांची स्थिती समाधानकारक आहे.
तर ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये यांच्या संख्येत घट झाली आहे. अधिवासाचा ऱ्हास, जंगल फोडणारे प्रकल्प, खाणकाम आणि स्थानिक लोकांकडून होणारी पारंपरिक शिकारी प्राण्याची घट होण्यामागे मुख्य कारण आहे.
सीमित अधिवास असलेले प्राणी
हॉग डिअर (जंगली डुक्कर), बारासिंगा, जंगली म्हैस, पिग्मी हॉग हे प्राणी त्यांच्या विशिष्ट अधिवासांमध्ये अडकून पडले आहेत. गवताळ भाग, दलदली आणि पुराचे मैदान यांचे अतिक्रमण व शहरीकरणामुळे यांचा अधिवास नष्ट होत आहे.
बारासिंगा: पूर्वी भारतभर विखुरलेला असलेला हा प्राणी आता केवळ कान्हा, दुधवा आणि काझीरंगा इथेच पहायला मिळातो. काही ठिकाणी पुनर्वसन झाले असले तरी हा प्राणी अजूनही अत्यंत संवेदनशील मानला जातो.
अन्नाची कमतरता
खुरधारी प्राण्यांची संख्या घटल्याने वाघांना जंगलात आवश्यक तेवढे अन्न मिळत नाही. त्यामुळे ते जंगलाबाहेर येऊन पाळीव जनावरांवर हल्ले करतात. यामुळे मानवी संघर्ष वाढतो आणि बऱ्याच वेळा वाघांना मारले जाते.
संवेदनशील राज्ये
मध्य प्रदेश, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये वाघांची संख्या सध्या निसर्गाने सहन करू शकणाऱ्या मर्यादेपर्यंत पोहोचली आहे (carrying capacity). म्हणून वाघ पूर्व-मध्य भारताकडे स्थलांतर करतात, पण तिथे अन्नसाखळी कमी असल्याने ते तग धरू शकत नाहीत.
मानव-वन्यजीव संघर्ष
नीलगाय आणि जंगली डुकरासारखे प्राणी शेती क्षेत्रात जातात आणि पीक हानी करतात. त्यामुळे शेतकरी रानडुकरांची शिकार करतात. त्याचवेळी वाघांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे तक्रारी वाढल्या आहेत.
निसर्गाचे रक्षण करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य म्हणून पर्यावरण दिन साजरा; जाणून घ्या 05 जूनचा इतिहास
वनांचे एकत्रीकरण: जंगलांचे खंडित होणे थांबवून ते एकत्र जोडण्यावर भर द्यायला हवा, ज्यामुळे प्रजातींमध्ये जनुकांचे मिश्रण शक्य होईल.
संवेदनशील प्रजातींसाठी विशेष उपाय: दलदली, पुराचे मैदान, आणि गवताळ अधिवासांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.
स्थानिक समुदायांचा सहभाग: पारंपरिक शिकारीला रोखण्यासाठी स्थानिक लोकांना पर्यायी रोजगार व शाश्वत पर्यटनाच्या संधी द्याव्यात.
शास्त्रीय अभ्यास आणि धोरणे: खुरधारी प्राण्यांवर नियमित अभ्यास आणि त्याच्या आधारावर धोरण आखली जावी.
भारतात वाघांचे संरक्षण हे केवळ त्या भव्य प्राण्याचे नव्हे, तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेचे संरक्षण आहे. वाघाच्या अन्नसाखळीतील घट प्रजातींचे, जंगलांचे आणि मानवी समाजाचे भविष्य धोक्यात आणू शकते. त्यामुळे अधिवास संरक्षण, अन्नसाखळीतील प्रजातींचे संवर्धन आणि स्थानिक समुदायांचा सहभाग यावर भर देणे काळाची गरज आहे.