जागतिक पर्यावरण दिन २०२५ (फोटो - istockphoto)
पुणे/ वैष्णवी सुळके: अन्न,वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. बदलत्या काळानुसार आज मानवी गरजा बदलल्या आहेत. ज्यामध्ये आरोग्यदायी गोष्टींबरोबरच आरोग्याला घातक असणार्या गोष्टींचा समावेश मानवाने केला आहे. त्यातीलच आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले प्लास्टिक आज पृथ्वीच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण करत आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिन हा प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित आहे.
प्रत्येक वर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि प्रदूषणाविरोधात जनजागृती निर्माण करणे हा या दिनामागील प्रमुख उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने १९७२ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्लास्टिकचा वापर, वाहतूक व्यवस्था यांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. यामुळे हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचा तुटवडा, प्रदूषण यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. पर्यावरण दिनाच्या माध्यामातून या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधले जाते.
यादिवशी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात आणि जनजागृती केली जाते. प्लास्टिक प्रदूषण ही केवळ पर्यावरणीय समस्या नसून ती मानवाच्या आरोग्याशी, जैवविविधतेशी आणि भविष्यातील शाश्वततेशी जोडलेली आहे. आज जगभरात दरवर्षी सुमारे ४० कोटी टन प्लास्टिक तयार होते. त्यातील निम्म्याहून अधिक प्लास्टिक केवळ एकदाच वापरले जाते आणि नंतर टाकून दिले जाते.
सहज वापरण्याजोगे आणि टिकाऊ असल्यामुळे प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु याचा नाश होत नसल्यामुळे पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे या पर्यावरण दिनाची संकल्पना प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही आहे. समुद्र, नद्या, जंगलं आणि अगदी आपल्या शहरातील रस्त्यांवरही प्लास्टिकचा साठा वाढत चालला आहे. ही संकल्पना जागतिक स्तरावर सर्व देशांना आणि नागरिकांना एकच संदेश देते – आता वेळ आली आहे प्लास्टिकचा वापर थांबवण्याची.
प्लास्टिक हे एक असे पदार्थ आहे जे सहज विघटित होत नाही. त्यामुळे ते माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढवते. प्लास्टिकचा वापर सोपा आणि स्वस्त असला तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. एकदा वापरलेले प्लास्टिक शेकडो वर्षे विघटित होत नाही. हे प्लास्टिक नद्यांमध्ये, समुद्रात, जंगलात आणि शहरांमध्ये साचते. त्यामुळे प्राणी, पक्षी, मासे यांचा जीव धोक्यात येतो. मायक्रोप्लास्टिक अन्न साखळीत प्रवेश करते आणि मानवी आरोग्यावरही परिणाम करते.
प्लास्टिक प्रदूषणाची वाढती समस्या लक्षात घेता अनेक स्वयंसेवी संस्था (NGO) समाजात जनजागृती करण्याचे कार्य करत आहेत. या संस्था शाळा, महाविद्यालये, सोसायट्या व सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत माहिती देतात. व्याख्याने, पोस्टर स्पर्धा, स्ट्रीट प्ले, स्वच्छता मोहिमा, आणि पर्यावरणपूरक उत्पादने वापरण्याचे प्रशिक्षण अशा विविध माध्यमांतून त्या लोकांपर्यंत संदेश पोहोचवतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅशटॅग मोहीम, माहितीपूर्ण व्हिडिओ, इन्फोग्राफिक्स यांच्या साहाय्याने तरुण पिढीला सहभागी करून घेतात. याशिवाय काही संस्था समुद्रकिनारे, नद्या आणि सार्वजनिक उद्याने येथे प्लास्टिक गोळा करण्यासाठी ‘बीच क्लीनअप’ आणि ‘प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह’ सारख्या उपक्रमांचे आयोजन करतात.
प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या असली तरी त्यावर स्थानिक उपाय महत्त्वाचे आहेत. पर्यावरणावर काम करणार्या संस्थांच्या प्रयत्नांतून समाजात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. मात्र ही लढाई दीर्घकाळ चालणारी असून, प्रत्येक नागरिकाने यात स्वत; आपली भुमिका बजावणे आवश्यक आहे. यासाठी आपण एकदाच वापरून फेकून देणारे प्लास्टिक पूर्णपणे टाळायला हवा. प्लास्टिक पिशव्या, कप, बाटल्या, चमचे यांसारख्या घटकांचा वापर थांबवायला हवा. त्याऐवजी कापडी पिशव्या, स्टीलची भांडी, काचेच्या बाटल्या वापरुन प्लास्टिकचा अंत करण्यास मदत होईल. जे प्लास्टिक वापरले गेले आहे, त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवावे. प्लास्टिकचा अंत हा फक्त पर्यावरणासाठी नाही तर मानवी आरोग्य, भविष्यातील अन्नसुरक्षा आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या सवयी, विचार आणि कृतीत बदल घडवून आपण प्लास्टिकमुक्त भविष्य घडवू शकतो.