संग्रहित फोटो
नवी दिल्ली : क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करा आणि झटपट पैसे पाठवा, यूपीआयद्वारे पैसे देण्याचा हा फंडा प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे. 2022 23 मध्ये ‘यूपीआय’वरील आर्थिक देवाणघेवाण 139 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा नवा उच्चांक आहे. मात्र, यावेळी वैशिष्ट्य म्हणजे, यूपीआय पेमेंटबाबतीत (UPI Payments) खेड्यांनी प्रथमच शहरांवर मात केली आहे. यूपीआय पेमेंटची गावांची हिस्सेदारी वाढून 25 टक्के झाली असून, शहरांची हिस्सेदारी 20 टक्के राहिली आहे.
एसबीआयने जारी केलेल्या एका अहवालानुसार, 2015-16 मध्ये यूपीआयद्वारे फक्त 6,947 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. त्यानंतर आता यूपीआय व्यवहारांची संख्याही 1.8 कोटींवरून 8,375 कोटींवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात यूपीआयद्वारे 8.9 अब्ज व्यवहार झाले. त्यातून 14.1 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. आघाडीच्या 15 राज्यांमध्ये 90 टक्के यूपीआय व्यवहार झाले.
एटीएमच्या वाऱ्या झाल्या कमी
पूर्वी लोक पैसे काढण्यासाठी सरासरी 16 वेळा एटीएमवर जायचे. आता केवळ 8 वेळा जातात. डिजिटल पेमेंट वाढल्यामुळे लोकांच्या एटीएमचा वापर घटला आहे. सध्या देशात 2.5 लाख एटीएम आहेत. अहवालानुसार, किरकोळ देवाणघेवाणीच्या बाबतीत यूपीआयचे मूल्य वाढून 83 टक्के झाले आहे. 30 ते 35 लाख कोटी रुपये एटीएमची एकूण देवाणघेवाण (डेबिट कार्ड) राहिली. एटीएमची देवाणघेवाण जीडीपीच्या 12.1 टक्के आहे.
2000 रुपयांच्या नोटेचा परिणाम नाही
आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट मागे घेण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अहवालात म्हटले आहे. नोटा जमा झाल्यामुळे बँकांना लिक्विडिटीच्या बाबतीत मदत होणार आहे. नोटा परत घेतल्यानंतर सुमारे 3 लाख कोटी रुपये बँकिंग सिस्टिममध्ये येतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 668 टक्के डिजिटल पेमेंटचे प्रमाण 2015-16 मध्ये जीडीपीच्या तुलनेत होते. ते आता 767 टक्के झाले आहे. आरटीजीएस वगळता किरकोळ डिजिटल पेमेंट 129 टक्क्यांवरून वाढून 242 टक्के झाले आहे.