'ऑपरेशन सिंदूर'नंतरही कुरापती सुरुच; पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. त्यातच भारताने पाकिस्तानमध्ये शिरत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं होतं. यामध्ये 9 दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली आहेत. असे असताना आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यातच पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर (ऑपरेशन सिंदूर) नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात एक भारतीय सैनिक शहीद झाला. भारतीय लष्कराच्या ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ने एक जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘व्हाईट नाईट कॉर्प्स युनिट’ने सांगितले की, ‘पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात 5 फील्ड रेजिमेंटचे लान्सनायक दिनेश कुमार हे शहीद झाले. त्यांचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांना सलाम’
भारताच्या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या गोळीबारात वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या अंदाधुंद गोळीबारामुळे शेकडो रहिवाशांना भूमिगत बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. नियंत्रण रेषेवरून झालेल्या गोळीबारात घरे, वाहने आणि गुरुद्वारासह विविध इमारती उद्ध्वस्त झाल्या.
सीमावर्ती भागांतील नागरिकांमध्ये भीती
सर्वात जास्त प्रभावित पूंछ जिल्हा आणि उत्तर काश्मीरमधील राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथील सीमावर्ती रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय सैन्य गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर देत आहे, गोळीबारात सहभागी असलेल्या त्यांच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक आणि मोठ्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व निमलष्करी दलांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत.