जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाचा जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला. तब्यतीचे आणि आरोग्याचे कारण देत जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. त्यांनी अचानकपणे पद सोडल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. जगदीप धनखड यांनी आता उपराष्ट्रपतींचा अधिकृत बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
जगदीप धनखड हे आज (दि.01) उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडणार आहेत. आज सायंकाळच्या सुमारास ते अधिकृत निवासस्थान सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. जगदीप धनखड हे दक्षिण दिल्लीमध्ये राहायला जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान रिकामे करून दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी) प्रमुख अभय सिंग चौटाला यांच्या फार्महाऊसमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
21 जुलै रोजी राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड हे जोरदार चर्चेत आले होते. राजीनामा दिल्यापासून धनखड हे सार्वजनिपणे समोर आलेले नाहीत. यामुळे विरोधकांनी जोरदार टीका देखील केली. जगदीप धनखड हे नॉट रिचेबल असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. मात्र राजीनामा दिल्यापासून एका महिन्यापासून ते उपराष्ट्रपतीच्या अधिकृत निवासस्थानातच असून, येथे ते त्यांच्या नातेवाईक आणि जुन्या मित्रांना भेटत आहेत. आज ते डॉक्टरांना भेटण्यासाठी बाहेर पडले होते”, असे एका सूत्राने सांगितले. उपराष्ट्रपतीपादाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानातून बाहेर पडले असल्याचेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी) प्रमुख अभय सिंग चौटाला यांनी देखील जगदीप धनखड हे रहायला येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमचे जुने कोटुंबिक संबंध आहेत. त्यांनी मला घर मागितले नव्हते तर, मी त्यांना घर देऊ केले, असे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ ऑगस्ट ही नामांकनाची शेवटची तारीख आहे. तर नामांकनांची छाननी 22 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही 25 ऑगस्ट 2025 असणार आहे. तर 9 तारखेला मतदान झाल्यानंतर मतमोजणी करुन निकाल हाती येणार आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही जोरदार चर्चेचा विषय ठरली असून कोण हे पद मिळवणारे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.