मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maratha Reservation : मुंबई : आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषण सुरु केले आहे. एकीकडे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे संपूर्ण मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मुंबई रस्ते देखील जाम झाले असून रेल्वे मार्गावर देखील आंदोलक उतरले आहे. यामुळे मार्गामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलकांकडून रस्त्यावर कबड्डी, खो खो खेळली जात आहेत. तर भररस्त्यात अंघोळ केली जात आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रचंड अस्वच्छता देखील केली जात आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वी बरेच मोर्चे काढले आहेत. त्यांची चर्चा ही देशभर झाली आणि कुठेही गालबोट लागले नाही. कारण असे झाले तर समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते अडवणे किंवा रिर्झेव बॅंकेसमोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळणार नाहीये, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज जरांगे पाटील हे स्वत: आझाद मैदानावर बसलेले आहेत. तर सर्व मराठा बांधवांनी देखील आझाद मैदानावरच गेले पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला आलो कशा करता? त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको आहेत. आपलीही बदनामी नको. आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईमध्ये थोडा परिणाम होईल, पण मला वाटत नाही की, यावर टीका करण्याचे काही कारण आहे, असे स्पष्ट मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिल करा
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “शेवटी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठा बांधव हा आझाद मैदानात येत असेल तर त्यात गैर काही नाही पण त्याशिवाय अन्य ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यात समाजाचीही बदनामी होते, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे”असे ते म्हणाले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, उपसमिती अध्यक्ष आणि महाधिवक्ता यांच्यात बैठक पार पडणार आहे.