जम्मू-श्रीनगर महामार्ग चौथ्या दिवशीही बंद, ३७०० वाहने अडकली, मुघल रोड पुन्हा सुरू
Jammu-Kashmir Flood: जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि रस्ता वाहून गेला आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे, जम्मूच्या पूंछ जिल्ह्याला काश्मीरच्या शोपियान जिल्ह्याशी जोडणारा आंतरप्रादेशिक मुघल रोड तीन दिवसांच्या बंदनंतर वाहतुकीसाठी पुन्हा उघडण्यात आला आहे. भूस्खलन, चिखल आणि दगड पडल्यामुळे जम्मू श्रीनगर महामार्ग आणि सिंथन रोड अनेक ठिकाणी बंद असल्याची माहिती एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
गेल्या दोन आठवड्यापासू उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे महामार्ग अनेक वेळा बंद करावे लागले. ३० ऑगस्ट रोजी तो काही तासांसाठी खुला करण्यात आला होता, परंतु आतापर्यंत तो एकूण दहा दिवसांसाठी बंद आहे. या बंदमुळे, कठुआ ते काश्मीर अशा विविध ठिकाणी ३,७०० हून अधिक वाहने अडकल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवासी आणि खाजगी कारसारख्या हलक्या मोटार वाहनांना (LMVs) मुघल रोडवरून पूंछ ते शोपियान आणि शोपियान ते पूंछ जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या जड मोटार वाहनांमध्ये (एचएमव्ही) फक्त सहा टायर ट्रक पूंछहून शोपियानकडे जाण्याची परवानगी आहे. याशिवाय, तीन दिवसांपासून बंद असलेला जम्मू-राजौरी-पूंछ महामार्ग देखील भूस्खलन दूर केल्यानंतर खुला करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावर जखेनी (उधमपूर) ते श्रीनगर आणि जखेनी ते बाली नाला दरम्यान रस्ता अडवल्यामुळे वाहनांची हालचाल होणार नाही.
नागरोटा (जम्मू) ते रियासी, चेनानी, पटनीटॉप, दोडा, रामबन, बनिहाल आणि श्रीनगरकडे वाहनांची वाहतूक देखील प्रतिबंधित आहे. रामबन-बनिहालमधील शालगरी, नाचिलाना, पंथ्याल, मारुग आणि पीराह हे सर्वात जास्त प्रभावित भागात आहेत, जिथे रस्त्याचे काही भाग आणि संरक्षक भिंती वाहून गेल्या आहेत. पीराह बोगद्याच्या एका भागातही मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. उधमपूर सेक्टरमधील जखेनी, थारा ड, बाली नाला आणि देवल दरम्यान सुमारे १० किमी रस्त्याचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम लांबणीवर पडत आहे. रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत लोकांना प्रवास करू नये आणि अधिकृत सूत्रांकडून रस्त्याची स्थिती तपासण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
गुरुवारी चिनाब खोऱ्यासह लागून असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तीन दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनामुळे महामार्गाचा मोठा भाग कोसळून वाहतुकीचा संपर्क तुटला होता. त्यामुळे खोऱ्याचा देशाच्या उर्वरित भागाशी असलेला दळणवळण पूर्णपणे बंद झाला.
सध्या उधमपूर ते चिनानी, सुधममहादेव, मंतलाई, लाती तसेच बटोट, रामबन आणि बनिहाल या मार्गांवर वाहतूक बंद आहे. याशिवाय चिनाब खोऱ्याला लागून असलेल्या दोडा, किश्तवार आणि भदरवाह या भागांशी संपर्क पूर्णतः तुटला आहे. गुरुवारी हवामान स्वच्छ झाल्यानंतर महामार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, तात्पुरता एकतर्फी मार्ग तयार करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागू शकतात.