नवी दिल्ली : सध्या अमली पदार्थांचं व्यसन (Drugs) ही एक मोठी समस्या बनली आहे. त्याला अटकाव करण्यासाठी ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’कडून (NCB) कडक पावले उचलली जात आहेत. त्यात आता असा एक कुख्यात गुन्हेगार आहे जो आख्ख्या जगालाच ड्रग्जचा पुरवठा करत आहे. ‘नवा दाऊद’ अशी त्याची ओळख होत आहे. त्याचं नाव आहे हाजी सलीम उर्फ हाजी अली (Drug Mafia Haji Salim).
हाजी सलीम उर्फ हाजी अली याच्यावर एनसीबीसह सर्व भारतीय एजन्सी बारीक लक्ष ठेऊन आहे. मात्र, हाजी सलीम हा सीमेपलीकडे बसून अर्ध्या जगामध्ये अंमली पदार्थांचा व्यापार चालवत आहे. हाजी सलीम उर्फ हाजी अली उर्फ हाजी सलीम अली हा अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्याचं वास्तव्य हे पाकिस्तानात आहे. तो मोठा ड्रग डीलर आहे. यापूर्वी तो अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर ड्रग्जची तस्करी करत असायचा. मात्र, नंतर त्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेपलीकडे अनेक देशांमध्ये आपला व्यवसायाचे जाळे पसरवले.
काय आहे ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’अंतर्गत देशातील विविध एजन्सींच्या सहकार्याने 1 वर्षात 40 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहेत. पाकिस्तानात बसलेला हाजी सलीम हा सर्वात मोठा ड्रग ऑपरेटीव्ह आहे.
ISI आणि अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन
‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा खरा चेहरा उघडा केला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीच्या या प्रकरणात आयएसआय आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आले आहे. तसेच, भारतात पाठवल्या जाणार्या ड्रग्जमधून आयएसआय आणि अंडरवर्ल्डलाही आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.






