Gold Rate : देशात सोन्याचा दर पोहोचला एक लाखावर; 'हे' प्रमुख कारण ठरतंय दरवाढीचे... (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : सर्वात चांगली गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. याचा कलही वाढला आहे. त्यात देशात पहिल्यांदाच सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅन आणि फेडरल रिझर्व्हमधील आमूलाग्र सुधारणांच्या योजनेमुळे, मुंबईच्या सराफा बाजारात 24 कॅरेट (99.9 टक्के शुद्धता) सोन्याची किंमत 101350 रुपये आहे. 22 कॅरेट मानक सोन्याचा दर 95400 रुपये आहे.
भारतातील सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय किमतीवर अवलंबून असते. मार्च 2024 च्या तुलनेत, सोन्याचा भाव सध्या 59 टक्क्यांनी वाढून $3500 प्रति औंस झाला आहे. डॉलर कमकुवत झाल्याने सोने महाग झाले. अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाबद्दल अनिश्चितता आहे. डॉलरच्या किमतीत घसरण होऊनही फेडरल रिझर्व्ह (रिझर्व्ह गोल्ड रिझर्व्ह) प्रमुख जेरोम पॉवेल व्याजदर कमी करत नाहीत. यामुळे ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकन गुंतवणूकदारांचा विश्वासही डळमळीत झाला आहे. डॉलरचे मूल्य गेल्या 3 वर्षात सर्वांत जास्त घसरले आहे. सोन्याचे भाव वाढत असताना शेअर बाजारात जोखीम वाढली आहे.
अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे महागाई वाढत आहे आणि डॉलरचे मूल्य कमी होत आहे. जर डॉलरवरील व्याजदर कमी केला नाही तर ते फेडरल रिझर्व्ह प्रमुखांना काढून टाकण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे ट्रम्प म्हणाले. रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेल्या तणावाचा सोन्याच्या किमतींवरही परिणाम झाला आहे. फेडरल रिझर्व्हने इशारा दिला की, टॅरिफमुळे किंमती स्थिर ठेवणे आणि पूर्ण रोजगार राखणे कठीण होईल.
ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्ह यांच्यातील सुरू असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदार मागे हटले आहेत. अमेरिकेचा आर्थिक दृष्टिकोन आणि कर्ज संकट यामुळेही परिस्थिती आणखी बिकट होत आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वृत्तीमुळेही सोन्याच्या किमती इतक्या उंचीवर पोहोचल्या आहेत.