शिलाँग : मेघालयमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या 18 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. यात भाजप महिला मोर्चाच्या दोन पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बेलिना एम. मारक आणि दिलचे च मारक अशी त्यांची नावे आहेत. तुरा येथील मुख्यमंत्री कोनराड संगमा (CM Conrad Sangma) यांच्या कार्यालयावर जमावाने हल्ला केला, ज्यात 5 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
दोन टीएमसी नेत्यांवर हल्लेखोरांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे, ज्यांचा पोलिस शोध घेत आहेत. हल्ल्याच्या वेळी संगमा हे अचिक कॉन्शियस होलिस्टिकली इंटिग्रेटेड क्राईम आणि गारो हिल्स स्टेट मूव्हमेंट कमिटीच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. तुरा हिवाळी राजधानी करावी, या मागणीसाठी संघटना गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. चर्चा जवळपास संपली होती. पण अचानक जमाव आला आणि दगडफेक करू लागला. जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. जमावाने मुख्यमंत्री कार्यालयाचे गेट तोडण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात 21 वाहनांचे नुकसान झाले.






