My mother was kidnapped, sexually assaulted"; The boy himself made serious allegations, the Prajjwal Revanna sex tape case

  Prajwal Revanna Row : गेल्या दोन आठवड्यांत कर्नाटकमधील प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल व्हिडीओ प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाल्याची पाहायला मिळत आहे. याच प्रज्ज्वल रेवण्णांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी व भाजपच्या नेतेमंडळींनी प्रचारसभा घेतली होती. भाजपाच्या मित्रपक्षातील उमेदवारावरच इतका गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता व्हायरल झालेल्या लैंगिक शोषणाच्या व्हिडीओंमधील महिला त्यांची घरंदारं सोडून निघून जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
  नेमकं प्रकरण काय?
  माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू व संयुक्त जनता दलाचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा याच्या कथिक सेक्स स्कँडल व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि खळबळ उडाली. एक-दोन नव्हे, तर जवळपास २९०० व्हिडीओ क्लिप्स असल्याचं तपासात समोर आलं आहे. एका पेन ड्राईव्हमध्ये या क्लिप्स असून खुद्द प्रज्वल रेवण्णा याच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप संबंधित तक्रारदाराला दिल्याचंही स्पष्ट झालं आहे.
  प्रज्ज्वल रेवण्णाचे जर्मनीला पलायन
  एकीकडे कर्नाटकमधील मतदान झाल्यानंतर म्हणजेच २६ एप्रिलपासून प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीला पळून गेल्याचं स्पष्ट झालेलं असताना दुसरीकडे देवेगौडा घराण्याचा पूर्ण अंमल असलेल्या हसन मतदारसंघात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक जेडीएसच्या नेत्यांनीच याचं भीषण वास्तव ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर उघड केलं आहे.

  पीडित महिलांनी सोडली घरं
  ‘इंडियन एक्स्प्रेस’नं हसन जिल्ह्यातील तीन शहरं आणि पाच गावांना भेटी दिल्यानंतर तिथे दिसलेलं वास्तव भीषण असं होतं… तिथल्या सगळ्यांनीच नाव न सांगण्याच्या अटीवर संवाद साधला. आणि हे सगळं रेवण्णा कुटुंबाच्या दहशतीमुळे! “हा पूर्ण जिल्हाच एच. डी. रेवण्णांच्या (प्रज्वल रेवण्णांचे वडील) नियंत्रणात आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल चुकीचं काही बोललात तर ती बाब त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यताच अधिक. कारण त्यांचं कुटुंब आणि पक्षाचे खूप सारे समर्थक आहेत”, असं हसन शहरापासून २० किलोमीटर अंतरावरच्या हगारे गावातील एका दुकानदारानं सांगितलं.
  आमदार एच. डी. रेवण्णा यांनाही अटक
  हसन हा पूर्वीपासून जेडीएसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आला. मात्र, हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता या मतदारसंघातली परिस्थिती बदलू लागली आहे. स्थानिकांमध्ये प्रज्वल रेवण्णांबाबत असंतोष दिसू लागला आहे. प्रज्वल रेवण्णांचे वडील आमदार एच. डी. रेवण्णा यांनाही शनिवारी एका महिलेचं अपहरण करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. या महिलेला या प्रकरणातील विशेष तपास पथकासमोर जाण्यापासून अडवण्यासाठी हे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  “…आणि तेव्हापासून तिचं घर बंद आहे”
  प्रज्वल रेवण्णाविरोधात २८ एप्रिल रोजी पहिला गुन्हा दाखल झाला. पण ज्या महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला, ती महिलाच आता घर सोडून निघून गेली आहे. “ही महिला रेवण्णाच्या घरी घरकाम करायची. तिचे काही व्हिडीओ व्हायरल व्हायला लागले आणि तेव्हापासून तिच्या घराला कुलूप दिसू लागलं. ती कधी निघून गेली हेही आम्हाला समजलं नाही”, अशी माहिती तिथल्या एका शेजाऱ्यानं दिली.

  पक्षासाठी काम करणाऱ्या महिलाही तणावात!
  दरम्यान, जेडीएसच्या एका स्थानिक नेत्यानं तर पक्षासाठी काम करणाऱ्या अनेक महिला संपर्काच्या बाहेर गेल्याचं सांगितलं. “आम्ही हे पाहतोय की, पक्षासाठी काम करणाऱ्या अनेक महिला त्यांचे प्रज्वल रेवण्णासोबतचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करत आहेत. काही ठिकाणी तर पुरुष त्यांच्या पत्नीला इथपर्यंत विचारणा करत आहेत की तिचे रेवण्णाशी काही संबंध आले होते का? जिल्ह्यातल्या अनेक महिलांच्या आयुष्यात यामुळे खळबळ माजली आहे”, अशी प्रतिक्रिया हसनपासून जवळच्याच एका गावातील संयुक्त जनता दलाच्या एका स्थानिक नेत्यानं दिली. याच गावात राहणाऱ्या एका महिला जिल्हा पंचायत सदस्यानं प्रज्वल रेवण्णाच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
  माझं तीन वर्षांपासून लैंगिक शोषण
  “माझं तीन वर्षांपासून लैंगिक शोषण होत होतं. त्याचे व्हिडीओ शूट केले जात होते”, असं या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. “ही महिला २४ एप्रिलपर्यंत तिच्या घरी होती. दुसऱ्या दिवशी व्हिडीओ बाहेर आले आणि तेव्हापासून ही महिला किंवा तिच्या कुटुंबापैकी कुणालाही आम्ही पाहिलेलं नाही”, अशी माहिती या स्थानिक नेत्यानं दिली आहे.
  Video व्हायरल झाले आणि ओळख जगजाहीर झाली
  व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यातील महिलांची ओळख जगजाहीर झाली. त्यामुळे तेव्हापासून अनेक महिला त्यांच्या कुटुंबियांसह हसन सोडून निघून गेल्याचं दिसून आलं आहे. जेव्हा एसआयटीचं पथक रेवण्णाच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं, तेव्हाही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सदर महिला निघून गेल्याची चर्चा होती. “या महिलेला मी ओळखतो. ती आमच्या घराजवळच राहायची. पक्षाच्या कामात खूप अॅक्टिव्ह होती. पण तिचं घर आता बंद आहे. तिला लहान लहान मुलं आहेत”, असं एक कार्यकर्ता दबक्या आवाजात कुजबुजताना दिसला, तर दुसऱ्यानं पीडित महिला त्याच्या शेजाऱ्यांची नातेवाईक असल्याचंही सांगितलं.
  व्हिडीओ व्हायरल करून जगजाहीर करणं पूर्णपणे चुकीचं
  “या पीडित महिलांची ओळख अशी व्हिडीओ व्हायरल करून जगजाहीर करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी त्यापैकी काही महिलांना ओळखतो. पण आता त्या महिला भीतीपोटी कुठेतरी निघून गेल्या आहेत. त्या कधी परत येतील का, हेही आम्हाला माहिती नाही. या कुटुंबांना रेवण्णाच्या विरोधात तक्रार करायचीच नव्हती. कारण रेवण्णा कुटुंबाविरोधात एखादा लढा देत असताना हसनमध्ये जिवंत राहणं कठीण आहे”, अशा शब्दांत एका दुकानदारानं स्थानिक पातळीवरची भीषण स्थिती विशद केली.
  देवेगौडांबद्दल काहींना सहानुभूती
  दरम्यान, एकीकडे या प्रकरणामुळे रेवण्णा कुटुंबावर परखड टीका होत असताना दुसरीकडे पक्षातील काही नेतेमंडळींना एच. डी. देवेगौडा यांच्याबद्दल सहानुभूतीही वाटतेय. “प्रज्वलनं जे केलं तो एक अक्षम्य गुन्हा आहे. देवेगौडांनी त्यांच्या आयुष्याची चार दशकं मेहनतीनं राजकीय कारकीर्द घडवली होती. पण प्रज्वलच्या या गुन्ह्यांमुळे काही क्षणांत ती कारकीर्द धुळीस मिळाली”, अशा शब्दांत काही पक्षकार्यकर्त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या.
  पक्षानं प्रचारच बंद केला!
  हे प्रकरण बाहेर आल्यापासून हसन जिल्ह्यात पक्षाचे नेते- कार्यकर्ते प्रचारासाठी बाहेरच पडलेले नाहीत. “या मतदारसंघातल्या तरुणांच्या मोबाईलमध्ये हे व्हिडीओ आहेत. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यासमोर जाऊन प्रज्वलसाठी मतं कशी मागायची?” असा रास्त सवाल पडूवलईप्पे गावातील स्थानिक नेत्यानं उपस्थित केला.
  प्रज्वल रेवण्णाचं फार्महाऊस.. गुन्ह्याचं केंद्र?
  याच गावात प्रज्वल रेवण्णाचं मोठं फार्महाऊस आहे. या फार्महाऊसला आठ फुटांच्या मोठ्या भिंती आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवण्णा वारंवार या फार्महाऊसमध्ये येत होते. गुन्ह्यातील काही व्हिडीओ इथेच शूट झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील इंटेलिजन्स युनिटला प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स स्कँडल व्हिडीओ क्लिप्सबाबत कल्पना होती. पण त्यांना हे प्रकरण इतकं मोठं असेल याचा अंदाज आला नाही. “व्हिडीओ क्लिप्सच्या पेनड्राईव्हबाबत २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी चर्चा होती. पण तेव्हा या क्लिप्स बाहेर आल्या नव्हत्या”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
  प्रज्वल रेवण्णाची कायदेशीर संरक्षणासाठी हालचाल
  दरम्यान, व्हिडीओ क्लिप प्रकरण वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रज्वल रेवण्णाने १ जून २०२३ रोजीच बंगळुरूच्या दिवाणी न्यायालयातून काही खासगी व्यक्ती व ८६ माध्यमांविरोधात गॅग ऑर्डर मिळवली होती. अर्थात संबंधितांबद्दलची कोणतीही माहिती किंवा सामग्री जाहीर होण्यापासून प्रतिबंध लावण्याचे आदेश. यात काही खासगी व्यक्तींचाही त्यांनी समावेश केला होता. भाजपाचे स्थानिक नेते जी. देवराजे गौडा हे त्यातलेच एक आहेत. प्रज्वल रेवण्णाचा ड्रायव्हर कार्तिकनं त्या सर्व व्हिडीओ क्लिप्सचा पेनड्राईव्ह देवराज गौडा यांनाच दिल्याचं जबाबात सांगितलं होतं.
  तपास अधिकाऱ्यांनाही नव्हता अंदाज!
  या प्रकरणाचा आवाका काही हजार व्हिडीओंचा असेल याचा अंदाज खुद्द तपास अधिकाऱ्यांनाही नव्हता, अशीही बाब एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या प्रतिक्रियेतून समोर आली आहे. “जानेवारी महिन्यात देवराज गौडांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती. तिथे ते हे व्हिडीओ प्रकरण जाहीर करतील असं बोललं जात होतं. पण ती पत्रकार परिषद अचानकपणे रद्द करण्यात आली. हे व्हिडीओ बाहेर येईपर्यंत आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की प्रज्वल रेवण्णाचा एखादा व्हिडीओ असेल. पण अनेक महिलांसमवेत त्यानं रेकॉर्ड केलेले जवळपास २९०० व्हिडीओ असतील अशी आम्हाला कल्पनाच नव्हती”, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
  एकंदरीतच कर्नाटकच्या राजकीय विश्वात प्रज्वल रेवण्णा प्रकरणामुळे मोठा गदारोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक राजकारणात प्रभाव असणाऱ्या आणि यंदाच्या निवडणुकीत भाजपाशी युती असणाऱ्या संयुक्त जनता दलाची प्रतिमा डागाळल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील निवडणुकांच्या निकालांवर या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.