संग्रहित फोटो
कन्नड : दोन गटात सुरु असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना शहरात घडली. विशेष म्हणजे ही घटना शहर पोलिस स्टेशन समोरच अंदाजे शंभर फुटावर घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फरार झालेल्या सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत माहिती अशी की, परवेझ खान (रा. करीमनगर) व त्याचे काका आदील खान यांच्यात घरगुती वाद झाल्याने रविवारी रात्री दोन्ही बाजुंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या. तक्रारी देवून पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले. तुंबळ हाणामारी झाली. यात नवीद अक्रम शेख याचा खून झाला. तर परवेझ खान व मोबीन शेख हे जखमी झाले.
कन्नडमधील घटनेने उडाली खळबळ
अझर शेख नुर (रा. टिळकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यानतर आम्ही चौघेजण परवेजच्या नातेवाईकासह पोलिस ठाणेच्या गेट बाहेर रेणुका ज्वेलर्स दुकानासमोर रात्री एक वाजेच्या सुमारास असतांना परवेज याला आण्णा उर्फ शाबीर शेख निहाल याने पाठीमागून येत डोक्यात मारले व त्याचे सोबतचे मोबीन युनुस शेख, बाबा मलीक निहाल शेख, अमेर लाला नेहाल शेख, मॅक्स उर्फ नाजीम सत्तार, मतीन शेख युनुस, जफर शेख अम्मू, अब्दुल मलीक महम्मद खालीद शेख यांनी पण चापट बुक्याने मारहाण केली. त्यांच्या तावडीतून परवेज खान यास फिर्यादी अझर, नवीद, इरफान शेख लतीफ, नौशाद शेख नईम, वाहाब खान उस्मान खान हे सोडवित असतांना नाजीम मॅक्स याने रेणुका ज्वेलर्स समोर त्याचे हातातील चाकने नवीद शेख अकरम याचे मानेवर व पोटावर चाकूने वार करुन त्यास गंभीर जखमी केले. मोबीन युनुस शेखही यामध्ये जखमी झाला. त्याला घेऊन ते सर्वजण फरार झाले आहेत.
पोटात, मानेवर केला चाकूने वार
रेणुका ज्वेलर्स समोर नवीद शेख अकरम हा खाली पडला. त्याचे पोटातून व मानेतून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला मी, इरफान शेख लतीफ, नौशाद शेख नईम, वाहाब खान उस्मान खान असे घाटी दवाखाना, कन्नड येथे उपचार कामी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या फिर्यादीनुसार बाबा मलीक निहाल शेख, अमेर लाला नेहाल शेख, आण्णा उर्फ शाबीर शेख निहाल, मॅक्स उर्फ नाजीम सत्तार सर्व (रा. मक्रणपूर ता. कन्नड), मतीन शेख युनुस, मोबीन युनुस शेख, दोन्ही (रा. नितीननगर, ता. कन्नड) जफर शेख अम्मु (रा. करीमनगर) यांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सानप करीत आहेत.






