बिजनौर : लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती (Mayavati) यांना मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरचे खासदार मलूक नागर (Malook Nagar) यांनी बसपाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर मलूक नागर यांनी राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांनी मलूक नागर यांचे तिकीट कापले होते. त्यांच्या जागी बसपाने विजेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मलूक नागर हे नाराज असल्याचे म्हटले जाते होते. मलूक नागर हे बसपाच्या ताकदवान नेत्यांपैकी एक होते. तसेच, ते मायावतींचेही जवळचे मानले जात होते. मलूक नागर हे उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात 249 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
मलूक नागर हे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा रियर इस्टेटचा व्यवसाय आहे. आयकर विभागाने ऑक्टोबर 2020 मध्ये मलूक नागर यांच्या कंपन्यांवर छापे टाकले होते.
मायावतींवर डागली तोफ
राष्ट्रीय लोकदलामध्ये प्रवेश केल्यानंतर मलूक नागर म्हणाले, मी २००६ पासून बसपामध्ये होते. हा एक ऐतिहासिक विक्रम आहे. कारण १८ वर्षे बसपामध्ये कोणीही राहिले नाही. बसपामध्ये लोकांना पक्षातून बाहेर काढले जाते किवा पक्ष सोडला जातो. मी २०२२ मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली नाही आणि २०२४ मध्ये खासदारकीची निवडणूकही लढवली नाही. घरी बसून देशासाठी काम करायचे नाही, हे योग्य नाही.
दरम्यान, याआधी मलूक नागर यांनी म्हटले होते की, घरी बसू शकत नाही, एका टर्मनंतर एकतर तुम्हाला पक्षातून हाकलून दिले जाईल किंवा पक्ष तुम्हाला घरी बसवेल, असा बसपाचा इतिहास आहे, असे मलूक नागर यांनी सांगितले होते.






