योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारी एक तरुणी असून तिला उल्हासनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीप योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यासारखंच तुम्हालाही संपवू, अशा धमकीचा संदेश नियंत्रण कक्षाला मिळाला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारी एक तरुणी असून तिला उल्हासनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा-Manoj Jarange Patil : अखेर मनोज जरांगेंनी ठोकला शड्डू; ‘या’ मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
फातिमा खान असं या तरुणीचं नाव असून तंत्रज्ञान शाखेतून पदवीधर आहे. तिची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे तिने नैराश्येतून ही धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे. दहा दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या नाहीतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची जशी गोळ्या झाडून हत्या केली, तसा तुमचाही शेवट करू, अशी धमकी या तरुणीने दिली होती.
शनिवारी सायंकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा एक संदेश मिळाला होता. अनोळखी क्रमकांवरून हा संदेश आला होता. दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्व येथे गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानलाही अशाच धमक्या दिल्या जात आहेत.
हेही वाचा-भाजपचं संकल्पपत्र प्रसिद्ध; तरुण, गरीब, महिलांसाठी कोणती आश्वासन दिली? वाचा सविस्तर
फातिमा खान उच्चशिक्षित तरुणी आहे. मात्र तिची मानसिक स्थिती बिघडली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथक आणि उल्हासनगर पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईत संशयित तरुणीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारनंतर प्रचाराचा बार उडणार आहे. भाजप आणि महायुतीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर ही धमकी आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर मुंबई पोलिसांना तिसऱ्यांदा अशाप्रकारे धमकीचा संदेश मिळाला आहे. २९ ऑक्टोबर रोजी सलमान खानकडे दोन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर पाच कोटींची खंडणी मागणाराही संदेश पोलिसांना मिळाला होता.
बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली होती. त्याची पोस्ट शुभम लोणकर यांच्या फेसबूकवरून करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत काहीजणांना अटक करण्यात आली असून अजून कोण कोण सामील आहे याचा शोध घेण्यात येत आहे.