‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणी चौकशासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन!

'महादेव अ‍ॅप' तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं असून यात सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

    नुकतचं केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग ॲप महादेवसह 22 बेटिंग सॉफ्टवेअर आणि वेबसाइट ब्लॉक (Mahadev Betting App Ban) केल्यानंतर महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्यासह 31 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. महादेवॲप प्रकरणी तपासासाठी आता मुंबई पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलं आहे.यात विशेष तपास पथकात सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    काही दिवसापासून चर्चत आलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून कसून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक जणांची चौकशीही करण्यात आली आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. काहींना चौकशीसाठी ई़़डीने समन्स बजावले होते. नुकतचं मुंबई पोलिसांकडून महादेव बुक बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, 15,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीसह याप्रकरणी मॅच फिक्सिंग, बेकायदा हवाला व कूट चलनाच्या व्हवहाराचे आरोप त्यांच्यावर आहेत.

    मुंबई पोलिसांच विशेष पथक स्थापन

    महादेव अॅप प्रकरणातील आरोपींविरोधात कलम 420, 465, 467, 120 बी, 12 अ, जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (क), 66 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आल्याने लवकरच याप्रकरणातील खरी माहिती समोर येईल.