4 राज्यांमधील ५ विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी (फोटो सौजन्य-X)
By Election Result 2025 Today : पंजाबसह देशातील ४ राज्यांमधील ५ विधानसभा जागांवर गेल्या आठवड्यात (१९ जून) झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज सोमवारी जाहीर होणार आहे. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आङे. पोटनिवडणुकीत सर्वांच्या नजरा ज्या जागांवर आहेत त्यात पंजाबची हाय प्रोफाइल लुधियाना पश्चिम जागा आणि गुजरातच्या २ विधानसभा जागांचा समावेश आहे. लुधियाना पश्चिम जागेव्यतिरिक्त, केरळमधील निलांबूर, पश्चिम बंगालमधील कालीगंज आणि गुजरातच्या २ जागा, काडी (राखीव जागा) आणि विसावदर जागा या पोटनिवडणुकीचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
पोटनिवडणुकीत ५ पैकी ४ जागांवर ट्रेंड समोर आले आहेत. लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये आपचे उमेदवार संजीव अरोरा आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत संजीव अरोरा काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण आशु यांच्यापेक्षा २४८२ मतांनी आघाडीवर आहेत. त्याआधी, पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अरोरा १२६९ मतांनी आघाडीवर होते. तसेच पश्चिम बंगालच्या कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या अलिफा अहमद यांना आघाडी मिळाली आहे. ४ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर त्या १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. केरळच्या निलांबूर मतदारसंघात यूडीएफचे काँग्रेस उमेदवार आर्यदान शौकत आघाडीवर आहेत. ९ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर शौकत ५४४८ मतांनी आघाडीवर आहेत.
गुजरातमध्ये पाहायला गेलं तर, गुजरातच्या विसावदर मतदारसंघातही भाजपने आघाडी घेतली आहे. विसावदर मतदारसंघातून भाजपचे किरीट पटेल आता मागे पडल्यानंतर आघाडीवर आहेत. आपचे उमेदवार इटालिया गोपाल ५ फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. ६ फेऱ्यांनंतर किरीट पटेल ४११ मतांनी पुढे आहेत. राखीव काडी जागेवर, ७ फेऱ्यांच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार राजेंद्र चावडा १३१९५ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे चावडा दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत कठीण लढाई मानला जात आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी (आप) ही पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांनी स्वतः पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या लढाईचे वर्णन ‘नम्रता’ आणि ‘अहंकार’ यांच्यातील लढाई असे केले होते. स्पर्धेद्वारे, आप पंजाबमध्ये आपला पक्का विजय टिकवू इच्छिते, तर काँग्रेस या शहरी मतदारसंघात पुन्हा विजयी लय मिळवू इच्छिते. काँग्रेसने ही प्रतिष्ठित जागा ६ वेळा जिंकली आहे.
या पोटनिवडणुकीत पने राज्यसभा सदस्य आणि लुधियाना उद्योगपती संजीव अरोरा (६१) यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री आणि पंजाब काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष भारत भूषण आशु (५१) यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पक्षाच्या पंजाब युनिटच्या कोअर कमिटीचे सदस्य असलेले ज्येष्ठ नेते जीवन गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे, तर शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) वकील आणि लुधियाना बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष परुपकर सिंह घुमन यांना उमेदवारी दिली आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. तर १९ जून रोजी पोटनिवडणूक झाली होती ज्यामध्ये ५१.३३ टक्के मतदान झाले होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर ६४ टक्के मतदान झाले होते.
त्याचप्रमाणे गुजरातमधील विसावदर आणि काडी जागांवर गुरुवारी पोटनिवडणूक झाली होती. ज्यामध्ये विसावदरमध्ये ५६.८ टक्के मतदान झाले होते आणि काडी जागेवर ५७.९ टक्के मतदान झाले होते. आपचे आमदार भूपेंद्र भयानी डिसेंबर २०२३ मध्ये राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये सामील झाले होते, त्यानंतर विसावदर विधानसभा जागा रिक्त झाली होती. विसावदर जागेवर भाजपचे किरीट पटेल, काँग्रेसचे नितीन रणपरिया आणि आपचे गोपाल इटालिया यांच्यात लढत असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, मेहसाणा जिल्ह्यातील अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव जागा ४ फेब्रुवारी रोजी भाजप आमदार करसन सोलंकी यांच्या निधनानंतर रिक्त झाली. भाजपने येथून राजेंद्र चावडा यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने माजी आमदार रमेश चावडा यांना तिकीट दिले. रमेश चावडा यांनी २०१२ मध्ये ही जागा जिंकली पण २०१७ च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या करसन सोलंकी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कालीगंज जागेवरील पोटनिवडणुकीचा निकालही येणार आहे. येथे सुमारे ७० टक्के मतदान झाले. फेब्रुवारीमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार नसिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. तृणमूल काँग्रेसने नसीरुद्दीन यांची मुलगी अलिफा यांना, भाजपने आशिष घोष यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसचे काबिल उद्दीन शेख हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय(एम)) च्या पाठिंब्याने निवडणूक रिंगणात आहेत.
तसेच, केरळच्या निलांबूर मतदारसंघातूनही निवडणुकीचा निकाल येणार आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर आरोप केल्यानंतर, अन्वर यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) नेतृत्वाखालील एलडीएफशी संबंध तोडले आणि आमदारपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर पोटनिवडणूक झाली. येथे सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) उमेदवार एम स्वराज, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीचे (यूडीएफ) आर्यदान शौकत, तृणमूल काँग्रेसचे राज्य युनिटचे संयोजक आणि अपक्ष उमेदवार पीव्ही अन्वर आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) मोहन जॉर्ज यांच्यासह १० उमेदवारांमध्ये लढत आहे.