राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई; EC तील सुनावणी संपल्यानंतर सुनील तटकरेंचे मोठे विधान, वाचा नेमके काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादीची लढाई निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर आता त्यावर दोन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. आता अजित पवारांची अध्यक्षपदाची निवडच बेकायदा असल्याचे आज शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केले आहे. परंतु, यावरून अजित पवार गटानेही प्रत्युत्तर दिले आहे.

  NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षाची लढाई निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे बंडखोरी प्रकरण निवडणूक आयोगाच्या दरबारी सुरू असताना, शरद पवार गटाकडून अजित पवार यांनी दिलेली शपथपत्रे खोटी असल्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटाने बाजू मांडली असून अजित पवार गटावर विविध आरोप केले आहेत. अजित पवारांची अध्यक्षपदाची निवडच बेकायदा असल्याचे आज शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केले आहे. परंतु, यावरून अजित पवार गटानेही प्रत्युत्तर दिले आहे. आजची सुनावणी संपल्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून शरद पवार गटावर आरोप केले आहेत.
  शरद पवार गटातील युक्तीवाद आज संपण्याची अपेक्षा
  “निवडणूक आयोगासमोरील शरद पवार गटातील युक्तीवाद आज संपण्याची अपेक्षा होती. युक्तीवाद पूर्ण न झाल्यास लेखी उत्तर मांडतील. परंतु, युक्तीवाद पूर्ण झालेला नाही. प्रकरणातील मेरिट लक्षात आल्याने शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. पुढच्या आठ दिवसांनंतरची तारीख वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला जातो, हे एकंदरित अनाकलनीय आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
  शरद पवार गटाचा पुढच्या सुनावणीत पूर्ण होणार युक्तीवाद
  ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ विधिज्ञ अर्धवट सुनावणी सोडून आले. आजच्या युक्तीवादात दम नसल्याने त्यांचे ज्येष्ठ विधिज्ञ युक्तीवाद सोडून आले असाही तर्क लावला जाऊ शकतो. आज एकंदरीत दोन तासांच्या युक्तीवादात तेच तेच मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. बुधवारी पुढच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुढच्या वेळी ते युक्तीवाद पूर्ण करतील असं आज त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. मग ताबडतोब आमच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी युक्तीवाद सुरू करतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
  सर्व प्रश्नांची कायदेशीर उत्तरे देणार
  अजित पवारांची अध्यक्षपदाची नेमणूक बेकायदा असल्याचा युक्तीवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, युक्तीवाद करत असातना काही भूमिका मांडावी लागते. याचं सविस्तर कायदेशीर उत्तर आमच्याकडे आहे. ज्यावेळी आमच्या बाजूने युक्तीवाद सुरू होईल तेव्हा हे आरोप खोडून काढले जातील. साऱ्या प्रश्नांची उत्तरे आमचा युक्तीवाद सुरू होईल त्या क्रोनोलॉजीनुसार दिले जातील. आज सर्व युक्तीवादात तेच तेच मांडलं गेलं.
  आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल
  “आम्ही हा (बंडखोरीचा) निर्णय घेत असताना सर्वोच्च न्यायालायने अलिकडे घेतलेला निर्णय, निवडणूक आयोगाने विविध पक्षांबाबत वेळोवेळी घेतलेले निर्णय या सगळ्याचा कायदेशीर, वैधानिक अभ्यास करून घेतला असल्याने आम्हाला विश्वास आहे की आमच्या निर्णयावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होईल”, असाही विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.