वाई परिसरात मुसळधार पाऊस (फोटो- सोशल मीडिया)
वाई तालुक्यासह संपूर्ण पश्चिम भागात मुसळधार पाऊस
पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
नद्या व धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत
वाई: वाई तालुक्यासह संपूर्ण पश्चिम भागात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक लहान-मोठे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पश्चिम भाग हा पावसाचा आगार म्हणून ओळखला जातो. महाबळेश्वरच्या सह्याद्री पर्वतरांगांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वेगाने खाली येत असल्याने या परिसरातील नद्या व धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. या भागातील जांभळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला असून परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.
महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण…
धोम व धोम-बलकवडी धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. जोर, गोळेवाडी, बलकवडी आदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढत आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने धरणातील साठ्यात दिवसेंदिवस भर पडत आहे.
धोम धरणाची सकाळी ७ वाजताची स्थिती (दि. ६ जुलै): धोम धरणाची जलपातळी ७३५.२५ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून एकूण पाणीसाठा १५१.८७ दशलक्ष घनमीटर (५.३६ टीएमसी) म्हणजे ३९.७२ टक्के झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा १००.६० दशलक्ष घनमीटर (३.५५ टीएमसी) म्हणजे ३०.३९ टक्के आहे. धरण परिसरात आज ९४ मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पर्जन्यमान ३९७ मिमीवर पोहोचले आहे.
धरणात सध्या ११,०८७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. आज दिवसभरात २७.१२४ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून १ जूनपासून आतापर्यंत एकूण ४७.९२६ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात जमा झाले आहे.
धोम-बलकवडी धरणातही आवक वाढली. धोम-बलकवडी धरणाची जलपातळी सकाळी ७ वाजता ७९५.८० मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा ५०.४४९ दशलक्ष घनमीटर (१.७८ टीएमसी) म्हणजे ४३.६७ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा ४७.०५९ दशलक्ष घनमीटर (१.६६ टीएमसी) म्हणजे ४१.९६ टक्के झाला आहे.
पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित
धरण परिसरात आज तब्बल ३०५ मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पर्जन्यमान ९५९ मिमीवर पोहोचले आहे. धरणात सध्या ७,१५७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून कोणत्याही मार्गाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. आज १७.५१० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून १ जूनपासूनची एकूण आवक ३१.२२७ दशलक्ष घनमीटर इतकी झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पश्चिम घाट परिसरात आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






