(फोटो- wikipedia)
Vande Bharat Metro: भारतीय नागरिक सार्वजनिक प्रवासासाठी अनेक साधनांचा वापर करतात. त्यामध्ये भारतीय रेल्वे ही वाहतुकीमधील एक महत्वाचा घटक आहे. दरम्यान आता केंद्र सरकार भारतीय रेल्वेमध्ये नवीन बदल करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय रेल्वेत केले जात आहे. देशभरात मेक इन इंडिया अंतर्गत केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन निर्माण करत आहे. त्याच्यापाठोपाठ आता वंदे भारत मेट्रो देखील भारतात धावणार आहे. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन देशातील कोणत्या राज्यात कधीपासून धावणार आहे, ते जाणून घेऊयात.
भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन भूज ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. म्हणजेच पहिली मेट्रो ट्रेन गुजरात राज्यातून धावणार आहे. आठवड्यातून ही मेट्रो ६ दिवस धावणार आहे. अहमदाबादमध्ये शनिवारी तर भूजमध्ये रविवारी मेट्रो बंद असणार आहे. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेनचे लोकार्पण १६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करणार होणार आहे.
काय आहे वेळापत्रक?
गुजरातमध्ये धावणारी पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन ही भूजपासून अहमदाबादपर्यंत चालवली जाणार आहे. यामध्ये अंजार, गांधीधाम, भचाव, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमतीला जाऊन थांबणार आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेन सकाळी ५.०५ वाजता भूजवरून अहमदाबादला रवाना होईल. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मेट्रो ट्रेन अहमदाबादला पोहोचणार आहे. तर संध्याकाळी ५.३० वाजता अहमदाबादवरुन निघालेली मेट्रो ट्रेन भूजला रात्री ११ ते सव्वा अकराच्या दरम्यान पोहोचेल. मेट्रो ट्रेन ९ स्थानकांवर थांबणार आहे.
देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोचे दरपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. या मेट्रोचे तिकीट कमीतकमी दर ३० रुपये असेल तर, यावर जीएसटी आकाराला जाईल. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी मासिक पासची सुविधा देखील दिली जाणार आहे. भूज अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत मेट्रोचा वेग हा ताशी १२० ते १५० किमी प्रति तास इतका असणार आहे.
पंतप्रधान मोदी करणार १० वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण
केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वे मंत्रालय एका पाठोपाठ एक अशा वंदे भारत ट्रेन देशवासीयांच्या सेवेसाठी सुपूर्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ सप्टेंबर रोजी झारखंड दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळेस ते जमशेदपूर येथून विविध राज्यांसाठी १० वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच वेळेस १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, झारखंड,बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत ट्रेनचा करणार आहेत. १५ सप्टेंबर २०२४ पासून या नवीन १० वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.