नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Elections Result 2024) जाहीर झाला. मंगळवारी (दि.4) या निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यानुसारच, आता त्यांच्याकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असताना शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला. बुधवारी संध्याकाळपर्यंत तिसऱ्यांदा मोदी सरकारच बनणार हे निश्चित झाल्यानंतर आता मंत्रिपद कोणाला याची चर्चा रंगली आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाटेला काय येणार याची उत्सुकता आहे. भाजपसोबत अनेक मित्रपक्ष जोडले गेले आहेत. या मित्रपक्षाच्या एनडीए आघाडीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली केल्या जात आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल या दोन्ही पक्षांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले होते. मात्र, आता त्यांनी एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अशातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, यात एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळणार आहे.