नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात नेमके कोणते विधेयक आणले जाणार यावर अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोड (Dress Code) लागू केला जाऊ शकतो, अशीदेखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
नव्या ड्रेस कोडशी संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत आणि बाहेरील कर्मचारी पुढील आठवड्यात संसदेच्या नवीन इमारतीत जाताना नवा गणवेश परिधान करणार आहेत. या नव्या गणवेशाला ‘भारतीयत्व’ची जोड राहणार आहे. नव्या वेषभूषेमध्ये दोन्ही सभागृहात मार्शलच्या डोक्यावर मणिपुरी टोपी दिसणार आहे. तर टेबल ऑफिस, नोटीस कार्यालय आणि संसदीय रिपोर्टिंग विभागातील अधिकाऱ्यांना कुर्ता असणार आहे. या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी कमळासारखा दिसणारा टी शर्ट तयार करण्यात आला आहे.
एनआयएफटीचे डिझाईन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवनातील कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा ड्रेस ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ म्हणजेच एनआयएफटीने डिझाईन केला आहे. महिलांसाठी डिझायनर साड्या सर्व महिला अधिकाऱ्यांना आणि महिला कर्मचाऱ्यांदेखील नवीन डिझाईन केलेल्या साड्या देण्यात येणार आहेत. नवीन संसद भवनातील राज्यसभेचे गालिचेही कमळाच्या आकृतिबंधाने सजवण्यात आले आहेत. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. यासोबतच भाजपाचे पक्षचिन्हदेखील आहे.
सचिवालयातही बदल
संसद सचिवालयाच्या पाचही प्रमुख शाखांचे अधिकारी- रिपोर्टिंग, टेवल ऑफिस, नोटीस ऑफिस, लेजिस्लेटिव्ह शाखा आणि मार्शलसह सुरक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संसदेच्या अधिवेशनात नवीन गणवेश परिधान करतील. याशिवाय पाच विभागामधील अधिकारी सफारी सूटऐवजी स्पोर्ट बटन डाऊन शर्ट घालतील. तसेच क्रीम रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.