Operation Lotus News:ओडिशात ऑपरेशन लोटस? काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी ५ कोटींची ऑफर
Opreation Lotus: राज्यसभा निवडणुकीसाठी आज (१६ मार्च) रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, एक मोठा राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. बेंगळुरूमध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पाच जणांनी ओडिशाच्या आठ काँग्रेस आमदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटींची ऑफर दिल्याचा आरोप आहे. ओडिशातील राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास यांनी केला आहे. या प्रकरणी बेंगळुरूमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून चार संशयितांची नावे समोर आली आहेत.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की, क्रॉस-व्होट करण्यासाठी एका हॉटेलमध्ये पाच जणांनी ओडिशाच्या ८ आमदारांना प्रत्येकी पाच कोटींची ऑफर देण्याचा प्रयत्न केला. यांसंबंधीची FIR दाखल झाल्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली. पण भाजपने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेस पराभवाच्या तोंडावर असल्याने ते काँग्रेसकडून खोटे आरोप केले जात असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते अनिल बिस्वाल यांनी केला आहे.
पक्षांतर टाळण्यासाठी ओडिशाच्या १४ काँग्रेस आमदारांपैकी आठ आमदारांना गुरुवारी बेंगळुरूमधील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते. ओडिशातील राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपने प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि राज्यसभेचे माजी खासदार सुजित कुमार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवाय, भाजपने तिसऱ्या जागेसाठी अपक्ष उमेदवार दिलीप राय यांना पाठिंबा दिला आहे. बीजेडीने संत्रुत मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे, तर पक्ष काँग्रेस आणि सीपीएमच्या पाठिंब्याने स्वतंत्र उमेदवार दत्तेश्वर होता यांना पाठिंबा देत आहे.
भाजप महायुतीकडे असलेल्या मजबूत संख्याबळामुळे, भाजपचे सामल आणि कुमार तसेच बीजेडीचे मिश्रा हे सहज विजयी होतील अशी अपेक्षा आहे. खरी लढत चौथ्या जागेसाठी आहे, जिथे क्रॉस-व्होटिंग आणि घोडेबाजाराच्या आरोपांमुळे होटा आणि राय यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.
कोरापूटचे खासदार सप्तगिरी शंकर उलाका म्हणाले की, चार जण, वीरेंद्र प्रसाद, सुरेश, अजित साहू आणि सिमांचल महाकुड – काँग्रेस आमदारांसोबत एकाच हॉटेलमध्ये राहत होते. हे चौघेही ओडिशाच्या राउरकेला येथून आले होते आणि शनिवारी रात्री तिथेच राहिले होते. त्यांनी आमदारांना प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून कोरे धनादेश जप्त करण्यात आले. कर्नाटक पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी भाजप समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांचे नाव घेतले.
उलाका यांनी आरोप केला की, ” राय हा हॉटेलचा मालक आहे. चौकशीदरम्यान, जयस्वाल नावाच्या व्यक्तीचे नावही समोर आले, जो ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या जवळचा असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी करत काँग्रेस खासदारांनी आरोप केला की या चार जणांनी काँग्रेस आमदारांना धमकावले होते.
ओडिशातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते अशोक कुमार दास म्हणाले की, आमच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी, आमचे आठ आमदार बेंगळुरूला आले आहेत आणि १२ मार्चपासून येथे राहत आहेत. ओडिशातील सत्ताधारी भाजपने अतिरिक्त उमेदवार उभा केल्यानंतर आमदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या भीतीने हे पाऊल उचलण्यात आले.
राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यासाठी काँग्रेस आमदारांवर दबाव टाकला जात असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून काँग्रेसने आपल्या ८ आमदारांना बेंगळुरू येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवले होते.डी.के. शिवकुमार यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी ऑनलाइन माध्यमातून आमदारांशी संपर्क साधला आणि मताच्या बदल्यात ५ कोटी रुपये देऊ केले. ही ऑफर नाकारल्यानंतर आमदारांना धमकावण्यात आल्याचाही आरोप आहे. काँग्रेसने या प्रकरणी बिरेंद्र प्रसाद, सुरेश, अजित कुमार साहू आणि सिमचल मोहकुद यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे.
ओडिशा विधानसभेतील भाजपचे संख्याबळ मर्यादित असतानाही त्यांनी अतिरिक्त उमेदवार उभा केल्याने ‘क्रॉस व्होटिंग’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले होते. बेंगळुरूमध्ये तळ ठोकून असलेले काँग्रेस आमदार रविवारी रात्री भुवनेश्वरकडे रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी हे सर्व आमदार राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात सहभागी होतील. या राजकीय संघर्षामुळे ओडिशातील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






