मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय दबावामुळे कारवाई केली नसल्याची पी चिदंबरम यांनी कबुली दिली (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून टाकले. या हल्ल्यात पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी १७५ हून अधिक लोकांचा बळी घेतला. आता, तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे एक मोठे विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याची योजना आखली होती, परंतु आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.
तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यांच्या मुलाखतीची सध्या पूर्ण देशभर चर्चा आहे. यामध्ये त्यांनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या धक्कादायक विधानामुळे चर्चांना उधाण आले. पी. चिदंबरम यांनी खुलासा केला की मुंबई हल्ल्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय दबावामुळे घेण्यात आला होता. भाजपने आता या विधानावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या आलेल्या या वक्तव्यावरुन भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.
विदेशी नेत्यांनी सांगितले युद्ध करू नका.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पी चिदंबरम यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, २६/११ नंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी लष्करी कारवाईबाबत चर्चा झाली होती. तथापि, तत्कालीन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कॉन्डोलिझा राईस, संयुक्त राष्ट्रे, युरोपीय देश आणि इतर जागतिक नेत्यांनी भारताला युद्ध सुरू न करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “संपूर्ण जग दिल्लीवर युद्ध सुरू न करण्यासाठी दबाव आणत होते. भारताने राजनैतिक आणि धोरणात्मक सल्ला विचारात घेऊन संयमाचा मार्ग निवडला.”
“माझ्या मनात प्रत्युत्तर होते” – चिदंबरम
पी चिदंबरम यांनी स्पष्ट केले की हल्ल्याच्या वेळी त्यांचा पहिला विचार असा होता की पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले पाहिजे. ते म्हणाले की हा हल्ला पाकिस्तानी भूमीतून झाला होता आणि भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे होते, परंतु सरकारने एकत्रितपणे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, “हा एक सामूहिक निर्णय होता, जो आंतरराष्ट्रीय परिस्थिती, परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला आणि पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा विचार करून घेतला गेला.” अशी कुबली पी चिदंबरम यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे. यामुळे भाजप नेत्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्याासाठी क्लिक करा
भाजपचे प्रत्युत्तर: ‘कमकुवत सरकारचे लक्षण’
पी चिदंबरम यांच्या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी चिदंबरम यांचे विधान काँग्रेसच्या कमकुवत परराष्ट्र धोरणाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, “काँग्रेस सरकार भारताच्या हितासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय दबावाखाली काम करत होते.” जोशी म्हणाले की, काँग्रेस सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची संधी गमावली, तर आजचे सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाने काम करत आहे.