पाकिस्तानमध्ये का आश्रय घेतात दहशतवादी? कारण ऐकून अमेरिका, ब्रिटनची उडेल झोप
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत दिलेली कबुली केवळ पाकिस्तानची दुहेरी भूमिका उघड करत नाही, तर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांसमोरही गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
ब्रिटनमधील एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अनेक मोठे खुलासे केले. मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्टपणे मान्य केलं की पाकिस्तानने दशकानुदशके दहशतवादाला समर्थन, प्रशिक्षण आणि निधी दिला आहे. त्यांनी हे अमेरिकेसाठी आणि पाश्चिमात्य देशांसाठी ‘डर्टी वर्क’ असल्याचं म्हटलं. “आम्ही तीन दशके अमेरिका आणि ब्रिटनसाठी हे काम केलं आणि त्याची किंमत आजही पाकिस्तानला चुकवावी लागत आहे.”
1980 च्या दशकात अमेरिका आणि पाश्चिमात्य देश अफगाणिस्तानमध्ये सोविएत संघाविरुद्ध युद्ध करत होते, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्या सांगण्यावरून दहशतवादी संघटनांना आश्रय देण्यास सुरुवात केली. “हेच ते दहशतवादी आहेत, ज्यांना एकेकाळी वॉशिंग्टन आणि लंडनमध्ये ‘वाइन आणि डाइन’ केलं गेलं.” 9/11 च्या घटनेनंतरही पाकिस्तानला पुन्हा एकदा या शक्तींसाठी प्यादं बनवण्यात आलं, आणि आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
पाकिस्तानने जर त्या युद्धांत सहभाग घेतला नसता, तर आज पाकिस्तानची प्रतिमा स्वच्छ राहिली असती. पण आता त्याला दहशतवाद्यांचं समर्थक मानलं जातं, आणि हे सगळं त्या काळातील चुकीच्या निर्णयांचं फलित आहे. या कबूलनाम्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. आता हे स्पष्ट झालं आहे की पाकिस्तान स्वतः दहशतवादाची पोषक भूमी बनला होता. मात्र, त्याला खत-पाणी घालण्याचं काम अनेक पाश्चिमात्य शक्ती करत होत्या.
त्यांना ख्वाजा आसिफ यांना लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा सहयोगी संघटन The Resistance Front बद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, लष्कर-ए-तोयबा आता पाकिस्तानात अस्तित्वात नाही. पण ही स्पष्टीकरण त्यांच्या इतर वक्तव्यांशी सुसंगत नाही, कारण Resistance Front नेच पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे आणि ही संघटना लष्करचीच प्रॉक्सी मानली जाते.
आसिफ यांनी हेही मान्य केलं की भारताच्या संभाव्य प्रतिहल्ल्याचा पाकिस्तानला भीती आहे. ते म्हणाले की, “जर भारत मोठा हल्ला करतो, तर पाकिस्तानही ‘मोजून-तोजून’ उत्तर देईल.” मात्र त्यांनी हेही मान्य केलं की भारताचा हल्ला मोठा असेल, तर थेट युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि ब्रिटनबद्दल आसिफ यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनने पाकिस्तानला दिलेल्या दशकांपासूनच्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे – ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला शस्त्र, निधी आणि प्रशिक्षण दिलं. आज हेच दहशतवादी भारतात हल्ले करत आहेत आणि संपूर्ण जगाला धोका निर्माण करत आहेत. हे दर्शवतं की या दहशवादाला खतपाणी फक्त पाकिस्ताननेच घातलेलं नाही तर पाश्चिमात्य शक्तीही भागीदार राहिल्या आहेत.
“मोठ्या शक्तींना या भागातील कुठल्याही घटनेचं खापर पाकिस्तानवर फोडणं सोपं जातं. पण सत्य हे आहे की पाकिस्तानच ती जमीन होती जिथे दहशतवाद फोफावला.” हाच तो देश आहे ज्याने ओसामा बिन लादेनला अनेक वर्षे आश्रय दिला आणि आजही दहशतवाद्यांना आश्रय देत आहे.जसा-जसा पहलगाम हल्ल्याची चौकशी पुढे जाईल, तसंतसं जगासमोर हे आणखी स्पष्ट होईल की पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनला आहे. ख्वाजा आसिफ यांचीही कबुली पाकिस्तानचं धोरण आणि नीती दोन्हींचा पर्दाफाश करते.