'सुरक्षेत चूक, गुप्तचर यंत्रणा फेल'; पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसचे सरकारला ६ महत्त्वाचे प्रश्न
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात ठोस पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेससह सर्वच पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला असून दहशतवादाच्या मुद्द्यावर सर्व विरोधीपक्ष सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे.
मात्र आता काँग्रेसने या हल्ल्यावर सरकारला थेट जबाबदार धरत सलग सहा प्रश्न विचारले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात म्हटले आहे की, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश भरात हळहळ व्यक्त होत आहे. पण काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे देशातील जनतेला हवी आहेत. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांनंतरही सुरक्षेतील अशी चूक कशी झाली? सैन्य आणि सीमा या थेट मोदी सरकारच्या अखत्यारीत असूनही दहशतवादी आतपर्यंत कसे पोहोचले? गुप्तचर यंत्रणांकडून एवढी मोठी चूक कशी झाली?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसने सरकारला कोणते प्रश्न विचारले?
सुरक्षेत अशी चूक कशी झाली?
गुप्तचर यंत्रणा अपयशी कशा ठरल्या?
दहशतवादी सीमेपासून इतक्या आत कसे आले?
२६ नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
गृह मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी चूक मान्य करून जबाबदारी स्वीकारतील का?
“नोटबंदीमुळे दहशतवाद संपेल असे सांगितले गेले होते, मग अशी परिस्थिती कशी निर्माण झाली?” २६ लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? काँग्रेसने सरकारला विचारले की, “गृह मंत्री ही अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील का? आणि ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीचा श्रेय घेतात, त्या प्रमाणे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतील का? की नेहमीप्रमाणे जबाबदारीपासून पळ काढतील?”, असा टोलाही लगावला आहे.
Former ISRO Chief K. Kasthurirangan Passed Away: इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन
या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “या दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. सर्व विरोधी पक्षांनी सरकारने घेतलेल्या कारवायांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. आम्ही त्या घटनेचा तीव्र निषेध करतो. देशाला असा संदेश द्यायचा आहे की सर्वजण एकत्र आहोत.”
राहुल गांधी यांनीही “दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत. सरकार जी कारवाई करेल त्याला आपला पाठिंबा असेल असं त्यांनी म्हटलं आहे.