हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मणिपूरला देणार भेट? 'असा' असेल दौरा (फोटो सौजन्य-X)
इम्फाळ : मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या उद्रेकानंतर दोन वर्षांहून अधिक काळानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मणिपूरला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनसार, पंतप्रधान 13-14 सप्टेंबर रोजी आसाम आणि मिझोरामला भेट देणार आहेत. या काळात ते मणिपूरलाही भेट देऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पंतप्रधानांचा मणिपूर दौरा लवकरच होणार आहे. अंतिम घोषणा करण्यापूर्वी अनेक घटक लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे सध्या त्यांच्या दौऱ्याची नेमकी तारीख सांगितली गेली नाही. मात्र, ते मणिपूरला भेट देणार असल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षांनी देखील अनेकदा पंतप्रधान मोदींना मणिपूरला न गेल्याबद्दल धारेवर धरले होते. यावरून टीकाटिप्पणी वेळोवेळी केली जात होती. असे असताना आता पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे.
मणिपूर येथील मैतेई आणि कुकी समाजातील बांधवांमध्ये संघर्ष सुरू होता. याच दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला. त्यापासूनच विरोधक मोदी सरकारला कोंडीत पकडत आहेत. या संघर्षात 250 हून अधिक लोक मारले गेले आणि 57000 हून अधिक लोक विस्थापित झाले. त्यानंतर, याचवर्षी 13 फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. असे केल्याने आता तुलनेने येथील सामान्य परिस्थिती आहे. दरम्यान, पंतप्रधान मिझोरमहून इम्फाळला जाणार आहेत, जिथे ते 13 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील.
राष्ट्रपती राजवट हटवण्याची मागणी
इम्फाळस्थित एका संस्थेचे सल्लागार जितेंद्र निंगोम्बा म्हणाले की, मोदींच्या भेटीमुळे शांतता किंवा तोडगा निघेल अशी आशा आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपवून पुन्हा सरकार स्थापन करण्याची मागणी एनडीएच्या आमदारांकडून वाढत आहे. ही मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आणि त्यांच्या जवळचे आमदारांचा समावेश आहे.