PMO New Name: पंतप्रधान कार्यालय आता 'सेवा तीर्थ' नावाने ओळखले जाणार; तर राजभवन 'लोकभवन' होणार
राजधानी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) नवीन संकुलाला आता ‘सेवा तीर्थ’ असे नाव दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून उभारण्यात येणाऱ्या या संकुलाचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
पूर्वी ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’ म्हणून ओळखले जाणारे हे संकुल नव्या स्वरूपात पंतप्रधान कार्यालयासाठी तयार होत असून, त्यात कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि इंडिया हाऊस यांची कार्यालये देखील असणार आहेत.
या संकुलातील इंडिया हाऊस हे भेट देणाऱ्या मान्यवरांशी उच्चस्तरीय संवाद साधण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण ठरणार असून, आंतरराष्ट्रीय बैठका, चर्चा आणि धोरणात्मक संवादासाठी ते खास तयार करण्यात येणार आहेत.नवीन PMO संकुलामुळे सरकारच्या प्रशासनिक कामकाजात अधिक समन्वय आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतातील सार्वजनिक संस्थांमध्ये एक मोठा बदल होत आहे. प्रशासनाची कल्पना सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे सरकत आहे. हे बदल केवळ प्रशासकीय नाही तर सांस्कृतिक देखील आहे. पंतप्रधान कार्यालय (PMO) त्याच्या ७८ वर्षांच्या साउथ ब्लॉकमधून “सेवा तीर्थ” नावाच्या नवीन प्रगत कॅम्पसमध्ये जात आहे. हा बदल सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक प्रमुख भाग आहे.
केंद्र सरकारने दिल्लीतील ‘राजपथ’च्या नावात बदल करून ‘कर्तव्य पथ’ असे करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हा रस्ता आता एक संदेश देतो: सत्ता हा अधिकार नाही; तर एक कर्तव्य आहे. २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नावही बदलण्यात आले होते. पूर्वी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव ‘रेसकोर्स रोड’ असे होते, परंतु २०१६ मध्ये हे नाव बदलून ‘ लोक कल्याण मार्ग’ असे करण्यात आले. हे नाव सार्वजनिक कल्याणाच्या भावनेला अधोरेखित करते. अधिकाऱ्यांच्या मते, कल्याणाची भावना व्यक्त करते आणि प्रत्येक निवडून आलेल्या सरकारच्या भविष्यातील कामाची आठवण करून देते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या विविध क्षेत्रांची पुनर्रचना करून त्यांना “कर्तव्य” आणि पारदर्शकता या मूल्यांचे प्रतिक देण्याचा प्रयत्न होत आहे. या संकल्पनेचा भाग म्हणून उभारण्यात आलेल्या केंद्रीय सचिवालय या विशाल प्रशासकीय केंद्राला ‘कर्तव्य भवन’ असे नाव देण्यात आले आहे.
सरकारचा भर सत्तेवर नव्हे तर सार्वजनिक सेवेला दीर्घकालीन वचनबद्धता देण्यावर असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. “हे बदल एका खोल वैचारिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. भारतीय लोकशाही आता सत्तेपेक्षा जबाबदारी आणि पदापेक्षा सेवेचे प्रतीक बनत आहे,” असे सूत्रांनी सांगितले. नावांतील बदल केवळ प्रतिमा बदलण्यासाठी नसून, मानसिकतेतील बदलाचे प्रतिनिधित्व करतात, असेही सांगितले जाते. नव्या योजनेत प्रशासनाची भाषा आज सेवा, कर्तव्य आणि नागरिक-प्रथम दृष्टिकोनावर आधारित असल्याचे स्पष्ट केले जात आहे.






