जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांना समर्थन देणाऱ्या ८० पेक्षा अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) राजीनामा (Resignation) दिला आहे. सर्व आमदारांनी रविवारी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राजीनामे सादर केले. ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत, ते सर्व आमदार अशोक गेहलोत यांच्या अधिकृत निवासस्थानी जाणार आहेत.
अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress Presidential Election) उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे विधिमंडळ गटाचा नवा नेता निवडण्यासाठी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे प्रभारी अजय माकन आणि पक्षनिरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खरगेही (Mallikarjun Kharge) बैठकीला उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही (Sachin Pilot) या बैठकीला हजर होते. या बैठकीमध्ये केवळ नेतानिवडीचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे गेहलोत यांनी जाहीर केले होते. मात्र बैठकीपूर्वी गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामास्त्र उगारले आहे.
Rajasthan | Congress MLAs leave from the residence of Assembly speaker CP Joshi in Jaipur#RajasthanPoliticalCrisis pic.twitter.com/aqyrDUbOgj
— ANI (@ANI) September 25, 2022
गेहलोत समर्थक आमदार बैठकीकडे फिरकले नाहीत. त्याऐवजी ते मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर जमून बसमधून विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या घरी गेले. रात्री उशिरा काँग्रेसच्या ८२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले. २०२० साली सचिन पायलट यांनी पक्षांतर्गत बंड केले होते. या काळात सरकारला पाठिंबा देणारा उमेदवारच राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री असावा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.