आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र सादर केले; समोरचे लोक ताकद दाखवू शकले नाही तर आम्ही काय करणार; प्रफुल्ल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा

NCP Crisis : आज राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी असून, याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाची लढाई निवडणूक आयोगात पोहचल्याने मोठी चुरशीची लढाई आज होणार आहे. आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. समोरचे लोकं ताकद दाखवू शकले नाही तर आम्ही काय करणार, असा खोचक टोला प्रफुल्ल पटेलांनी शरद पवार यांना लावला आहे.

    NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये युक्तिवाद होणार आहे. आज एक गट आपली बाजू मांडणार आहे. अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली.

    राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय मान्यता काढली

    आज याबाबत सुनावणी होणार आहे. सुनावणीपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रफुल पटेल म्हणाले, दोन्ही गटांचे वकील आयोगात आपली बाजू मांडणार आहेत. आम्हाला खात्री आहे की, जवळपास संघटनात्मक अधिक लोक आमच्यासोबत आहेत. निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय मान्यता काढून घेतली आहे.

    या दोन राज्यांत आम्हाला मान्यता प्राप्त

    त्यामुळे नागालँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत आम्हाला मान्यता प्राप्त आहे. त्या अर्थाने नागालँडमधील ७ आमदार तर महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.
    इतर संघटनात्मक लोक आमच्यासोबत आहेत. आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समोरचे लोक काही ताकद दाखवू शकले नाही. तरी हा माझा विषय नाही. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेणार, असे पटेल म्हणाले.

    शरद पवार निवडणूक आयोगात होणार हजर

    शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहणार आहेत. यावर प्रफुल पटेल म्हणाले, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. ज्यांना संविधानात वेगळा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या दर्जाचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे तिथं कोण गेले. तो विषय महत्त्वाचा नाही. तथ्य आणि कायदा महत्त्वाचा आहे. आम्हाला विश्वास आहे की, निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्ह आम्हाला देईल.