फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSEBoard : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ पासून विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांचा अभ्यास करणे अनिवार्य असेल. या नवीन नियमांतर्गत शिकवल्या जाणाऱ्या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या भारतीय वंशाच्या असणे आवश्यक आहे.
हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) २०२३ च्या धर्तीवर घेण्यात आला आहे. मात्र, बोर्डाने स्पष्ट केले आहे की, इयत्ता १० वीमध्ये तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही बोर्ड परीक्षा आयोजित केली जाणार नाही. सीबीएसईच्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय भाषा आणि संस्कृतीशी जोडणे हा आहे.
सीबीएसईच्या नवीन नियमानुसार, भाषा विषयांची विभागणी R1, R2 आणि R3 या तीन स्तरामध्ये करण्यात आली आहे.
भाषा नियमांशिवाय सीबीएसईने गणित आणि विज्ञान या विषयांमध्येही मोठा बदल केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या दोन्ही विषयांमध्ये द्वि-स्तरीय प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थांना गणिताचा मानक (Standard) अभ्यासक्रम वाचावा लागेल. ज्यामध्ये ८० गुणांची सामान्य परीक्षा असेल.
तर दुसरीकडे प्रगत स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी २५ गुणांची एक वेगळी प्रश्नपत्रिका असेल. ज्यामध्ये कठीण प्रश्न विचारले जातील. ही नवीन व्यवस्था सध्याच्या बेसिक आणि स्टँडर्ड मॅथ्स सिस्टिमची जागा घेईल. बोर्डाच्या माहितीनुसार, या नवीन प्रणालीनुसार पहिली इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा वर्ष २०२८ मध्ये आयोजित केली जाईल.






