Prajwal Revanna Case : कर्नाटकमधील प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. प्रज्ज्वल रेवण्णांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप होताच, त्यांनी भारतातून पळ काढला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात अद्यापही चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता प्रज्ज्वल रेवण्णांचे आजोब आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पत्राद्वारे प्रज्ज्वल रेवण्णा यांना इशारा दिला आहे. तू जिथे कुठे असशील तिथून भारतात परत ये, अन्यथा तुला आमच्या रोषाचा सामना करावा लागेल, असे ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर त्यांनी हे पत्र पोस्ट केलं आहे.
माजी पंतप्रधान देवेगौडांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“सद्यस्थितीत मी फक्त एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे त्याला ( प्रज्वल रेवण्णा ) भारतात येण्यास सांगू शकतो. मी त्याला आवाहन करत नाही. तर थेट इशारा देतो आहे की तो जिथे कुठे असेल, त्याने भारतात यावं आणि पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं. जर त्याने माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याला माझ्या आणि कुटुंबियांच्या रोषाचा सामना करावा लागेल. जर त्याच्या मनात माझ्याविषयी थोडा तरी आदर असेल, तर त्यांनी लगेच भारतात परत यावं, असं देवेगौडा यांनी पत्रात म्हटलं आहे.”, असं देवेगौडा यांनी पत्रात म्हटलं आहे.
I have issued a warning to @iPrajwalRevanna to return immediately from wherever he is and subject himself to the legal process. He should not test my patience any further. pic.twitter.com/kCMuNJOvAo
— H D Deve Gowda (@H_D_Devegowda) May 23, 2024
या पत्रात त्यांनी त्यांनी याप्रकरणाच्या तपासात कोणतीही दखल देणार नाही, असं आश्वासनही दिलं. “मला स्पष्टपणे सांगायचं आहे की प्रज्वल रेवण्णा भारतात आल्यानंतर याप्रकरणाच्या तपासादरम्यान मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य दखल देणार नाही. त्याच्यावर कायद्यानुसार जी कारवाई व्हायची ती होईल”, असे ते म्हणाले.
लोकांच्या मनात आमच्या विषयी राग
पुढे बोलताना, “मला कल्पना आहे की, लोकांच्या मनात आमच्या विषयी राग आहे. मला त्यांना काहीही बोलायचं नाही. त्यांना प्रत्युत्तरही द्यायचं नाही. त्यांच्याशी वादही घालायचा नाही. खरं तर त्यांनी याप्रकरणी संपूर्ण तथ्य बाहेर येईपर्यंत, त्यांनी वाट बघायला हवी”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
कायद्यानुसार प्रज्ज्वल रेवण्णावर कारवाई करण्याची जबाबदारी
दरम्यान शनिवारी (दि. १८ मे) माध्यमांशी संवाद साधताना प्रज्ज्वल रेवण्णा सारख्या गुन्हेगाराला मोकळे सोडता कामा नये, असेही देवेगौडा म्हणाले होते. तसेच आपला मुलगा आणि प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर लावलण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, एचडी कुमारस्वामी यांनी या विषयाबाबत अनेकदा कुटुंबाच्या वतीने माध्यमांशी संवाद साधला आहे. कायद्यानुसार प्रज्ज्वल रेवण्णावर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. एचडी रेवण्णावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या, हे आता लोकांनाही कळले आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटीक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, रेवण्णा यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.