संग्रहित फोटो
पुणे : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सल्लागार राहिलेल्या जेसन मिलर यांना पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारकडून लॉबिंगसाठी नेमण्यात आले, असल्याची माहिती समोर येत आहे. या नेमणुकीनुसार जेसन मिलर यांना दर महिन्याला तब्बल १ लाख ५० हजार अमेरिकी डॉलर्स इतके मानधन देण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केंद्र सरकारकडे जेसन मिलर यांच्या संदर्भात तातडीने खुलासा करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात ॲड. आंबेडकर यांनी विचारले आहे की, भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राला स्वतःचे परराष्ट्र खाते असताना, अशा परदेशी व्यक्तीची लॉबिंग करण्याची गरज का भासते? भारत सरकारने याबाबत पारदर्शकता दाखवून स्पष्टीकरण द्यावे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्पष्टपणे सांगावे की, जेसन मिलर यांची नेमणूक केंद्र सरकारच्या वतीने झाली आहे का? आणि जर झाली असेल, तर ती कोणत्या कारणास्तव करण्यात आली? याची माहिती देशातील जनतेला देण्यात यावी, असं आंबेडकर म्हणाले.
“जेसन मिलर यांच्याकडून परवानगी आल्याशिवाय भारत सरकार कोणतीही कारवाई करणार नाही का?” असा गंभीर सवाल उपस्थित करत, ॲड. आंबेडकर यांनी भारत सरकारकडून या प्रकरणावर त्वरित आणि विश्वासार्ह उत्तर मागितले आहे. जेसन मिलर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले आहे.