दक्षिण काश्मीरमध्ये २० ठिकाणी छापेमारी; स्लीपर सेलचा पर्दाफाश
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरुद्ध सुरू झालेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. राज्य तपास संस्थेने (SIA) दक्षिण काश्मीरमध्ये सुमारे २० ठिकाणी छापे टाकून स्लीपर सेल नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असून, काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
SIA ने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे की, जम्मू आणि काश्मीर पोलिस सध्या दहशतवादी सहकारी आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGWs) वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तांत्रिक गुप्तचर यंत्रणेद्वारे उघड झालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील हे स्लीपर सेल थेट पाकिस्तानातील त्यांच्या नियंत्रकांशी संपर्कात होते. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल यांसारख्या मेसेजिंग अॅप्सद्वारे हे लोक सुरक्षा यंत्रणा व महत्त्वाच्या ठिकाणांबाबत संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुढे पाठवत होते.
याव्यतिरिक्त, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांच्या आदेशावर हे सहकारी ऑनलाइन कट्टरपंथी प्रचारात सहभागी होते, ज्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि प्रादेशिक अखंडतेला गंभीर धोका निर्माण झाला होता. छाप्यादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, हे गट केवळ दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय नव्हते, तर असंतोष पसरवणे, सार्वजनिक अशांतता घडवून आणणे आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करणे यामागेही त्यांचा सहभाग होता.
‘ऑपरेशन सिंदीर’ अंतर्गत पाकिस्तानात हल्ला; ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भ्याड कृत्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली, आणि त्यानुसार केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तान व पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रीत हल्ले करून ते नष्ट केले.
Pandharpur : दोन्ही राष्ट्रवादींचे लवकरच मनोमिलन? आमदार अभिजीत पाटील यांनी दिले संकेत
त्यानंतरही पाकिस्तानकडून गेल्या चार पाच दिवसांत सातत्याने गोळीबार आणि क्षेपणास्त्रे भारताच्या दिशेने डागण्यात आली. भारतातील ३६ ठिकाणांना पाकिस्तानकडून लक्ष्य कऱण्यात आले होते. पण भारतीय सैन्याच्या तीनही दलांनी पाकिस्तानचे हे हल्ले परतून लावले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याच्या प्रभावी कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासोबत शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल वरील पोस्टद्वारे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाल्याचा दावा केला. ट्रम्प यांच्या या विधानाला भारत सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला असला, तरी भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले की गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय दोन्ही देशांमधील थेट चर्चेद्वारेच घेण्यात आला होता.