संग्रहित फोटो
चंदीगड : हरियाणातील शेतकरी आंदोलनामुळे पंजाबातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत शंभू सीमा आणि खनौरी सीमेच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. तसेच, पंजाबच्या भटिंडा आणि पटियालामध्ये शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत.
सध्या शंभू सीमेवर शेतकरी शांत बसले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाकडून फारशी कारवाई झालेली नाही. सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट असून, हरयाणामध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील बहादूरगडमध्ये 11 जवान आजारी पडले आहेत. त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
महामार्ग ठप्प, विमान भाड्यात 10 पट वाढ
आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला असून, चंदीगड, मोहालीहून चंदीगड-दिल्लीपर्यंत विमान भाड्यात 10 पट वाढ झाली आहे. अन्य दिवसांत तीन हजार रुपये प्रवास भाडे असताना आता हे भाडे 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
बीएसएफ तैनात
बीएसएफ आणि आयटीबीपीचे हे जवान टिकरी सीमेपूर्वी सेक्टर 9 ठिकाणी तैनात करण्यात आले होते. बीएसएफची तुकडी गर्ल्स कॉलेज, बहादूरगड येथे तैनात करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात संपूर्ण हरयाणा राज्यात एकूण 114 सुरक्षा कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.