पत्नीकडून शारीरिक संबंधास नकार ही क्रूरता; मध्यप्रदेश हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

लग्न करूनही जबाबदाऱ्या पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी ते वैध कारण असल्याचा महत्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) दिला आहे.

    भोपाळ : लग्न करूनही जबाबदाऱ्या पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी ते वैध कारण असल्याचा महत्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) दिला आहे. न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. 2006 मध्ये झालेल्या एका भांडणानंतर एका व्यक्तीच्या पत्नीने पुढच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे न्यायालयाने त्या व्यक्तीला घटस्फोट मंजूर केला.

    पतीने 2011 मध्ये भोपाळ येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. परंतु न्यायालयाने 2014 मध्ये तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अनेक प्रसंगी महिलेने लग्न सुरू ठेवण्यास आणि पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. शारीरिक अपंगत्व किंवा वैध कारणाशिवाय दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवण्यास एकतर्फी नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरता असू शकते.

    पतीला घटस्फोट मंजूर

    मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, लग्न केल्यानंतरही आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरतेसारखे आहे. आपले दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम असून बळजबरीने लग्न लावून दिल्याचे कारण सांगत पत्नीने 2006 सालापासून पतीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पतीने घटस्फोट मिळावा अशी करत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.