भारताची ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रातील ताकद आता केवळ देशांतर्गत बाजारापुरती मर्यादित राहिलेली नाही. भारतीय कार आता आफ्रिका, मध्यपूर्व, लॅटिन अमेरिका, युरोप आणि अगदी जपानसारख्या विकसित देशांमध्येही पोहोचत आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मधील आकडेवारीनुसार भारताच्या कार निर्यातीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
HS Code 8703 अंतर्गत उपलब्ध माहितीनुसार, FY26 मध्ये भारताने सुमारे 9 अब्ज डॉलर किमतीच्या प्रवासी वाहनांची निर्यात केली. ही मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, SIAM च्या अहवालानुसार भारतातून 9.05 लाख प्रवासी वाहनांची निर्यात झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे.
भारतातून सर्वाधिक कार निर्यात होणारा देश म्हणजे दक्षिण आफ्रिका ठरला. या देशाकडे 1.50 अब्ज डॉलर किमतीच्या कार पाठवण्यात आल्या, ज्याचा एकूण निर्यातीतील वाटा 16.6 टक्के आहे. परवडणाऱ्या, इंधन-कार्यक्षम आणि मजबूत वाहनांची मागणी असल्यामुळे भारतीय कार तेथे लोकप्रिय ठरत आहेत.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या यशात सिंहाचा वाटा असणारे हे ‘दिग्गज अभियंते’ तुम्हाला माहित आहेत का?
दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया असून, भारताने तेथे 1.26 अब्ज डॉलर किमतीची वाहने निर्यात केली. तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आहे, जिथे 1.12 अब्ज डॉलर किमतीच्या भारतीय कार विकल्या गेल्या. दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि मेक्सिको या तीन देशांचा मिळून भारताच्या एकूण कार निर्यातीमध्ये जवळपास 43 टक्के वाटा आहे.
विशेष म्हणजे जपान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. FY26 मध्ये भारताने जपानला 0.81 अब्ज डॉलर किमतीच्या कार निर्यात केल्या. जपान हा गुणवत्ता, सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी जगातील सर्वात कठोर बाजारांपैकी एक मानला जातो. त्यामुळे भारतीय वाहनांना जपानमध्ये मिळालेली स्वीकारार्हता ही भारतासाठी मोठी उपलब्धी मानली जाते.
हे 10 ऑटोमोबाईल कोर्सेस ठरू शकतात तुमच्या यशस्वी करिअरची चावी; जाणून घ्या पात्रता, संधी आणि स्कोप
याशिवाय यूएई, चिली, स्पेन, पेरू, श्रीलंका आणि ब्रिटन यांसारख्या देशांमध्येही भारतीय कारची मागणी वाढत आहे. यावरून भारताची निर्यात कोणत्याही एका प्रदेशावर अवलंबून नसून जागतिक स्तरावर विस्तारत असल्याचे दिसते.
मारुती सुझुकी, ह्युंदाई, निसान, टोयोटा आणि फोक्सवॅगन यांसारख्या कंपन्या भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करत आहेत. कमी उत्पादन खर्च, सुधारलेली गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांमुळे भारतीय कार जगभरात अधिक स्वीकारल्या जात आहेत. त्यामुळे भारत आता केवळ मोठी वाहन बाजारपेठ नसून जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे.






