कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात भाजपविरोधी (BJP) पक्षांनी हालचाली करायला सुरुवात केली आहे. भाजपाला पराभूत करता येऊ शकतं, हा विचार विरोधकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवरच होणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठीही जुळवाजुळव सुरु झाली आहे. याचदरम्यान राजस्थान काँग्रेसमध्ये (Rajasthan Congress) पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.(Sahcin Pilot News)
राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात पायलट यांनी वेळोवेळी जाहीर भूमिकाही घेतली आहे. काँग्रेस हायकमांडनं केलेल्या मध्यस्थीनंतर पुन्हा एकदा सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वाद शमला होता. मात्र आता पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्या रुपाने राजस्थान काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.
गेल्या काही दिवसांपासून सचिन पायलट यांनी आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारविरोधात ठाम भूमिका मांडलेली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी असलेले तणावपूर्ण संबंध खूपदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यात आता सचिन पायलट काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
कधी होणार घोषणा?
‘द वीक’च्या वृत्तानुसार सचिन पायलट येत्या आठवड्याभरात अर्थात 11 जून रोजी नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या काही महिने आधी काँग्रेससमोर या पक्षफुटीमुळे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. या सर्व धोरणांमध्ये सचिन पायलट यांना प्रशांत किशोर यांच्या आयपॅक संस्थेनं मदतीचा हात पुढे केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सचिन पायलट यांनी 15 मे रोजी काढलेल्या यात्रेमध्ये जयपूरमध्ये गेहलोत सरकारकडे काही मागण्या सादर केल्या होत्या. त्यात आधीच्या वसुंधरा राजे सरकारमधील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी, राजस्थान राज्य लोकसेवा आयोगाची पुनर्रचना तसेच पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई या मागण्यांचा त्यात समावेश होता. यासाठी त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला 31 मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे सचिन पायलट यांच्याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. आता नव्या पक्षाच्या चर्चेमुळे राजस्थान काँग्रेसचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.