माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, आरएमएल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य-X)
Satya Pal Malik Death News in Marathi : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. ते बराच काळ आजारी होते. त्यांनी आज म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी आरएमएल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. पूर्वी ते भाजपचे एक प्रबळ नेते होते. सत्यपाल मलिक यांना मे २०२५ पासून दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
सत्यपाल मलिक यांना मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या गंभीर आजारामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज (5 जुलै) दुपारी रुग्णालयाने सत्यपाल मलिक यांच्या निधनाची माहिती दिली. तसेच एक दिवस आधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचेही दिल्लीत निधन झाले. शिबू सोरेन यांनी सोमवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज ते पंचतत्वांमध्ये विलीन झाले.
सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी झाला. ते उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसवाडा गावचे रहिवासी होते. त्यांचा जन्म एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी आणि एलएलबीची पदवी घेतली. त्यांनी १९६८-६९ मध्ये मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केली. ते १९७४-७७ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते आणि १९८० ते १९८९ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगडमधून नवव्या लोकसभेचे सदस्य होते.
सत्यपाल मलिक यांनी ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बिहार आणि मेघालयाचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील सुरक्षेतील त्रुटी आणि किरू जलविद्युत प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर त्यांनी उघडपणे भाष्य केले, ज्यामुळे ते वादातही राहिले. नंतर ते भाजपचे प्रमुख टीकाकार बनले.