प्रयागराज : बहुचर्चित उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal Murder) आरोपी अतिक अहमद (Atiq Ahmed) याची पोलिसांसमोर हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी शाइस्ता परवीन (Shaista Parveen) ही फरार आहे. शाइस्तासोबत 3 मुख्य शूटर्सही फरार असल्याचं सांगण्यात येतंय. तीन महिन्यांपासून शाइस्तासह हे चौघे फरार असल्यानं आता त्यांना शोधायचं कसं? असा प्रश्न उत्तर प्रदेश पोलिसांना (UP Police) पडलेला आहे.
उमेश पाल हत्याकांडातील पुरावे आणि जबाबानंतर, या प्रकरणात शाइस्ता परवीन हीच गँगची लिडर असल्याचं पोलिसांचं आता म्हणणंय. शाइस्तावर 50 हजार रुपयांचं इनामही घोषित करण्यात आलेलं आहे. आता यापुढं शाइस्तावर गँगस्टरप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. माफिया अतिक अहमद याच्या हत्येनंतर आता ही गँग शाइस्ता चालवत असल्याचा दावा पोलीस करतायेत. याचबरोबर शाइस्ता परदेशात पळाली असून, तिथून ती गँग ऑपरेट करत असल्याची चर्चाही सध्या जोरात सुरु आहे.
शाइस्ताची संपत्ती होणार जप्त
माफिया अतिक अहमदची पत्नी असलेल्या शाइस्तावर 4 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात फसवणूक, कट कारस्थानं यासारख्या आरोपांचा समावेश करण्यात आलाय. यासह उमेश पाल आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांच्या हत्येचा गुन्हाही तिच्यावर दाखल आहे. उमेश पाल हत्याकांडात शाइस्ता आरोपी आहे.
शाइस्ता झाली गँगची लिडर
अतिक अहमदची गँग असलेल्या IS-227 मध्ये शाइस्ता परवीन हिनं तिची मुलं उमर, अली आणि आणखी एका मुलाचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. यासह इतरही काही नवे सहकारी या गँगमध्ये तिनं जोडल्याचं सांगण्यात येतंय. अतिकच्या गँगमध्ये जे गँगस्टर्स मेले आहेत, त्यांच्याऐवजी आता नवी नावं जोडण्यात येत आहेत, अशी माहितीही समोर आलीय. या प्रकरणात काही नावंही समोर आलीयेत.
शाइस्ता देशातून पळाल्याचा संशय
प्रयागराजच्या सुलेम सराय बाजारात 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल आणि दोन सुरक्षारक्षकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी शाइस्ता आणि 3 शूटर्स अद्यापही पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. शूट गुड्डू, साबीर आणि अरमान या तिन्ही शूटर्सविरोधात 5-5 लाखांचं इनामही जाहीर करण्यात आलंय. शाइस्ता, गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आलीय. या प्रकरणातील आरोपींनी परदेशात कुठेतरी आसरा घेतला असल्याचा दावा करण्यात येतोय.