भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे ‘मिशन आगमन’; स्काय-रूटचे विक्रम-1 पहिल्यांदाच अवकाशात दाखल होणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
मुंबई, 2 जुलै 2026: स्कायरूट एअरोस्पेसने आज आपल्या विक्रम-1 (ISRO) या प्रक्षेपण यानाच्या पहिल्या चाचणी उड्डाणासाठी प्रक्षेपण कालावधी (Launch Window) खुला झाल्याची घोषणा केली. विक्रम-1 हे भारतात खाजगी क्षेत्रातून विकसित करण्यात आलेले पहिले ऑर्बिटल-श्रेणीतील रॉकेट आहे. टेस्ट फ्लाइट-1चे प्रक्षेपण 12 जुलै नंतर कोणत्याही दिवशी होण्याचे नियोजन असून, हे एसडीएससी-शार, श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण स्थळी असेंब्ली आणि चाचणी प्रक्रिया पूर्ण होणे, तसेच हवामान, सुरक्षा आणि प्रक्षेपण क्षेत्राची अंतिम मंजुरी यांवर अवलंबून असेल. हा प्रक्षेपण कालावधी 4 ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे.
पवन कुमार चंदाना, सह-संस्थापक – मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायरूट एअरोस्पेस,”मिशन आगमनचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विक्रम-1मधील प्रत्येक प्रणालीच्या प्रत्यक्ष उड्डाणादरम्यानच्या कार्यक्षमतेविषयीचा महत्त्वपूर्ण डेटा संकलित करणे. प्रक्षेपणापासून ते उड्डाणाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत हे यान कशा प्रकारे कार्य करते, हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. हा डेटा केवळ जमिनीवरील चाचण्यांद्वारे पूर्णपणे मिळू शकत नाही. या डेटाच्या आधारे आम्ही आमच्या डिझाइनची पडताळणी करू आणि विश्वासार्ह, उच्च वारंवारतेचा व्यावसायिक प्रक्षेपण कार्यक्रम उभारण्यासाठी पुढील वाहन विकासाला दिशा देऊ. विक्रम-1चे उड्डाण होताच भारताचे खाजगी अवकाश उद्योगक्षेत्र यापूर्वी कधीही गाठले गेले नव्हते अशा एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LSST Camera: Supernova चे स्फोट एकाच वेळी दोनदा दिसणार? आईनस्टाईनच्या ‘त्या’ सिद्धांताचा भारतीय शास्त्रज्ञांसह महाप्रयोग
नागा भरत डाका, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायरूट एअरोस्पेस म्हणाले,”भारतात प्रक्षेपण यान तयार करण्याच्या स्वप्नापासून ते आता ऑर्बिटल उड्डाणाचा प्रयत्न करण्यापर्यंतचा हा प्रवास अतुलनीय राहिला आहे. 2022मध्ये विक्रम-एसद्वारे आम्ही आमच्या तांत्रिक पायाभूत क्षमतेची यशस्वी पडताळणी केली. आता विक्रम-1च्या माध्यमातून भारतात विकसित करण्यात आलेले भारतासाठी आणि जगासाठी असलेल्या विश्वासार्ह व उच्च वारंवारतेचे प्रक्षेपण कार्यक्रमाच्या दिशेने आम्ही आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल टाकत आहोत. ही मोहीम तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आणि शिकण्याची संधी या दोन्ही उद्देशांनी आखण्यात आली आहे. भारत सरकार, इन-स्पेस, इस्रो, आमचे गुंतवणूकदार, आणि सहकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BrahMos: UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा
विक्रम-1 हे सात मजली इमारती इतक्या उंचीचे, बहु-टप्पीय ऑर्बिटल प्रक्षेपण यान असून, ते पूर्णपणे कार्बन कॉम्पोझिट संरचनेत तयार करण्यात आले आहे. या यानात कंपनीने स्वतः विकसित केलेल्या प्रणोदन प्रणालींचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये 3D-प्रिंटेड इंजिन्स आणि उच्च-थ्रस्ट घन इंधन रॉकेट बूस्टर्सचाही समावेश आहे. लो-अर्थ ऑर्बिट मध्ये 350 किलो वजनापर्यंत छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या विक्रम-1च्या पहिल्या मोहिमेत 450 किमी उंचीवरील आणि 60-अंश ऑर्बिटल इन्क्लिनेशन असलेल्या कक्षेला लक्ष्य करण्यात येणार आहे.






