पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी प्रकरण; युट्यूबर ज्योती मल्होत्राचे थेट ISI सोबत संपर्क
हिसार: पाकिस्तानसाठी भारतीतील संवेदनशील गुप्त माहिती पाठविल्याप्रकरणी हरियाणामधील हिसार येथील युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक कऱण्यात आली आहे. तिच्या प्राथमिक चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती ही थेट पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या तीन अधिकाऱ्यांशी संपर्कात होती. दिल्लीतील पाकिस्तानी दुतावासात कार्यरत असलेल्या ‘दानिश’नावाच्या अधिकाऱ्या माध्यमातून ती आयएसआयच्या संपर्कात आली होती.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दिल्लीतील पाकिस्तानी दुतावासातून वीजा प्रक्रियेच्या आडून ISIचे एक पूर्ण नेटवर्क चालवले जात होते. पाकिस्तानात जाण्यासाठी वीजा अर्ज करणाऱ्यांना लक्ष्य करून त्यांना भारतातील गुप्त आणि संवेदनशील माहिती पुरवण्यासाठी तयार केले जोता होते. विशेष म्हणजे जे माहिती देण्यासाठी तयार होत त्यांना वीजा नाकारला जात नसे. ज्योती मल्होत्राही याच प्रक्रियेतून ISI च्या जाळ्यात अडकली.
ज्योती ही हरियाणा पॉवर डिस्कॉमच्या निवृत्त अधिकाऱ्याची मुलगी असून तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिच्या युट्यूब चॅनेलवर 3.21 लाख फॉलोअर्स असून, तिने तिच्या चॅनेलवर पाकिस्तानच्या प्रवासाबद्दलचीही माहिती दिली आहे. 13 मे रोजी केंद्र सरकारने गुप्तहेरीच्या आरोपाखाली ज्या अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले, तोच दानिश हा तिचा संपर्कात होता. ज्योतीने व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या माध्यमांतून भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याचे उघड झाले आहे.
2023 मध्ये ज्योतीला पाकिस्तानात जायचे होते. वीजासाठी तिने पाकिस्तानी दुतावासात अर्जही केला होता. त्यावेळी तिची दानिश सोबत भेट झाली. त्यानंतर ती अनेकदा त्याच्या संपर्कत आली. पाकिस्तानात गेल्यावरही तिला अली अहवान नावाच्या व्यक्तीने मदत केली. अली अहवान आणि दानिश यांचे जवळचे संबंध होते. धक्कादायक बाब म्हणजे च्या माहितीनुसार, चौकशीत ज्योतीने ISI अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची कबुली दिली आहे. गुन्हेगारी स्वरूपाचा हा गंभीर प्रकार असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, ज्योतीच्या संपर्कातील इतर व्यक्तींविषयी तपास सुरू आहे. भारत सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी, एका भारतीय व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या हालचालींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे चिंता व्यक्त केली होती. २०२४ सालची एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ज्योतीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची विनंती करण्यात आली होती.
कपिल जैन नावाच्या एका एक्स (ट्विटर) युजरने मे २०२४ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला ज्योतीच्या कारवायांची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्या व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब पेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि पोस्ट केले, “एनआयए, कृपया या महिलेवर बारकाईने लक्ष ठेवा. आधी ती पाकिस्तानी दूतावासातील एका कार्यक्रमात सहभागी झाली, नंतर १० दिवसांसाठी पाकिस्तानात गेली आणि आता ती काश्मीरला जात आहे. या सगळ्यामागे काही धोका असू शकतो.” अशी पूर्वकल्पना असलेला मेसेज एनआयएला केला होता.