मुंबई – मनी लाँड्रिग प्रकरणी दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरने माध्यमांच्या नावे आणखी एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ३ पानांच्या या पत्रात सुकेश म्हणाला – मी ठग असेल, तर केजरीवाल महाठग आहेत. त्यांनी मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी माझ्याकडे ५० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना मी हे पैसे दिले होते.
सुकेश आपल्या पत्रात म्हणाला – २०१६ च्या एका डिनर पार्टीत अरविंद केजरीवालही आले होते. त्यांच्या सूचनेनुसार मी कैलाश गेहलोत यांच्या असोला स्थित फॉर्म हाऊसवर जाऊन ५० कोटींची रकम दिली. कैलाश सध्या केजरीवाल सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत. माझे कथन सत्य असून, पोलिसांना त्याची पडताळणीही करता येईल.
सुकेशने आपल्या वकिलाच्या नावानेही एक पत्र लिहिले आहे. त्यात तो म्हणाला – १ नोव्हेंबर रोजी मी दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र लिहिले होते. त्यात मी त्यांना सांगितले की, तुरुंगात सुख-सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी केजरीवाल सरकारच्या तुरुंगात असणाऱ्या मंत्री सत्येंद्र जैन यांना १० कोटी रुपये दिले. मी उपराज्यपालांकडे जैन व तत्कालीन तुरुंग महासंचालक आपल्याला धमकावत असल्याची तक्रार केली. सुकेशच्या वकिलांनी या पत्राची पुष्टी केली आहे.