सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित, ‘या’ कारणामुळे मोहीम रद्द

सुनीता विल्यम्स या केनेडी स्पेस सेंटर येथून नवे बोइंग स्टार लाइनर घेऊन सकाळी आठ वाजताच्या सुमारास उड्डाण करणार होत्या. तसेच सुनीता विल्यम्स आपल्या सोबत गणपतीची मूर्ती आणि भगवद्‌गीता सोबत घेऊन जाणार होत्या.

    भारतीय वंशांच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) या तिसऱ्यांदा अवकाशामध्ये ७ मे ला झेपावणार होत्या. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांची अवकाश भरारी मोहीम रद्द करण्यात आली आहे. मात्र अद्याप पुढील तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने सविस्तर माहिती दिली आहे. सुनीता विल्यम्स या केनेडी स्पेस सेंटर येथून नवे बोइंग स्टार लाइनर घेऊन सकाळी आठ वाजताच्या सुमारास उड्डाण करणार होत्या. तसेच सुनीता विल्यम्स आपल्या सोबत गणपतीची मूर्ती आणि भगवद्‌गीता सोबत घेऊन जाणार होत्या. पण आता सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात कधी झेपावणार याची वाट पाहावी लागणार आहे. त्यांचे उड्डाण नेमके कोणत्या तांत्रिक कारणामुळे रद्द झाले हे अद्याप कळू शकलेले नाही.

    तिसऱ्यांदा अवकाशात झेपावण्यासाठी सुनीता विल्यम्स तयार होत्या. अवकाशात झेप घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी सुनीता विल्यम्स या प्रेरणादायी आहेत. अंतराळात भरारी घेण्याच्या ९० मिनिटं आधी ही मोहीम थांबवण्यात आली आहे. अमेरिकेतील अवकाश संस्था नासाने या संदर्भातील माहिती दिली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार,अंतराळामध्ये ऑक्सिजनची लेव्हल व्यवस्थित काम करत नव्हती. त्यामुळे सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम रद्द करण्यात आली आहे.

    सुनीता विल्यम्स यांच्यासह नासाचे बुच विल्मोर हे नासाचे अनुभवी अंतराळवीर बोईंग स्टारलाइनर या अंतराळयानातून अवकाशामध्ये झेप घेणार होते. परंतु मोहिम स्थगित केल्यामुळे त्यांना अंतराळयानाच्या बाहेर यावे लागले. ही मोहीम पुन्हा एकदा राबवली जाणार आहे. मात्र अद्याप याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अवकाशात कधी झेपावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.