नवी दिल्ली : मोदी आडनावाचा (Modi Surname) अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकीही गेली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने भाजप आमदार पूर्णेश मोदी आणि गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे.
राहुल गांधी यांनी मोदी आडनाव बदनामी प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकार आणि भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावून या प्रकरणी दहा दिवसांत उत्तर देण्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
न्यायालयाने राहुल गांधींना ठरवले दोषी
गुजरातच्या सुरत न्यायालयाने या मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवले असून, त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. या सर्वाविरोधात राहुल गांधींनी आधी सुरत न्यायालयात आणि नंतर गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.






