फोटो सौजन्य - Social Media
नांदुरा : शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आपदा मित्र/आपदा सखी प्रशिक्षण कार्यक्रम नांदुरा येथे यशस्वीपणे पार पडला. १३ ते २४ जानेवारी या कालावधीत सुरू असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता समारोपीय कार्यक्रमाने करण्यात आली. तहसील कार्यालय नांदुरा येथील सभागृहात हा समारोप सोहळा उत्साहात पार पडला.
या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार संजय मारकंड होते. यावेळी हरीष गुरव, संभाजी पवार, विलास निंबाळकर, ओम नांदुरा साई फाउंडेशनचे अध्यक्ष, प्रशिक्षण मार्गदर्शक आंबे, शरदचंद्र पाटील, आपत्ती व्यवस्थापन पथक बुलढाणाचे प्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयीन सहायक विष्णू बारस्कर, प्रशिक्षक ऋषीकेश श्रीखंडे तसेच विशेष मार्गदर्शक, विद्यार्थी प्रेरक व कार्यक्रमाचे संचालन करणारे मनोज एम. जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपत्तीच्या काळात नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, स्थानिक स्तरावर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने आपदा मित्र/सखी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या प्रशिक्षणात नैसर्गिक आपत्ती, आग, पूर, भूकंप, अपघात, प्राथमिक उपचार, शोध व बचाव कार्य, आपत्तीच्या वेळी समन्वय कसा साधावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
समारोपाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. आपत्तीच्या प्रसंगी समाजासाठी तत्परतेने उभे राहणारे आपदा मित्र हे प्रशासनासाठी महत्त्वाचा दुवा ठरतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत निश्चितच होईल, असेही त्यांनी सांगितले.
मनोगत सत्रात प्रशिक्षणार्थी धनश्री पिवळटकर, मोहन सोनोने आणि शिल्पा उंबरकर यांनी आपले अनुभव मांडले. या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला, शिस्त, संघभावना तसेच सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आपदा मित्र म्हणून समाजासाठी काम करण्याचा अभिमान असल्याचे भावनिक शब्दांत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना यशस्वी सहभागाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यात आपत्तीच्या वेळी नांदुरा परिसरात हे प्रशिक्षित आपदा मित्र महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्नेहल तायडे यांनी केले.






