दिल्ली – आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सत्ताधारी भाजप देखील केंद्रातील तिसऱ्या टर्मसाठी जोरदार तयारी करत आहेत. यामध्ये नवनवीन चेहऱ्यांना समोर आणणं आणि नेत्यांना संधी देण्याचे काम सुरु आहे. यामध्ये आता भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचा धडाकेबाज राजकारणाचा वारसा यापुढे त्यांची मुलगी चालणार आहे. भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. बांसुरी स्वराज यांच्याविषयी सर्वांना कुतहल निर्माण झाली आहे.
भाजपाने आज लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये बांसुरी स्वराज यांचं नाव आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर बांसुरी स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत. बांसुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. दिल्ली बार कौन्सिलमध्ये त्यांनी २००७ मध्ये प्रवेश घेतला. दिल्लीत त्या मागच्या १६ वर्षांपासून वकिली करत आहेत. त्यांनी साहित्य हा विषय घेऊन वॉरवरिक विद्यापीठातून बी ए ऑनर्सचा कोर्स केला आहे. तसंच त्यांनी लंडन येथील बीपीपी लॉ स्कूलमधून वकिलीचं शिक्षण घेतलं तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलं आहे.
भाजपाचे दिल्लीचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांना जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा बांसुरी स्वराज यांना भाजपाच्या कायदा विभागाच्या सहसंयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.