लखनौ : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीणा (Sachin Meena) यांच्या प्रेम प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. भारतात घुसखोरी करणारी सीमा आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या पाकिस्तानी सीमाला आता भारताचे नागरिकत्व हवे आहे. यासाठी सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्याकडे दाददेखील मागितली आहे. दरम्यान, सीमा हैदरकडून अजून बरीच माहिती घेणे बाकी आहे. त्यामुळे तिची आता पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सीमा हैदरची तब्बल 18 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. सीमा प्रत्येक प्रश्नाचे अचूक आणि आत्मविश्वासाने उत्तर देत आहे. तिचा भारतात येण्यामागील हेतूबाबत सुरक्षा यंत्रणांनी संशय व्यक्त केला आहे. आता लवकरच तिची पॉलीग्राफसारखी मानसिक चाचण्या केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी तपास यंत्रणांना न्यायालयात परवानगी मागणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
सीमाचे वर्तन असामान्य
गुंतागुंतीचे प्रश्न टाळण्यासाठी सीमा हैदर कधी रडते तर कधी हसते. तिचे वर्तन असामान्य असल्याचे तपास यंत्रणांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. तिने कोणत्याही प्रश्नावर नाराजी किंवा राग दाखवला नाही. तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. कोणत्याही प्रश्नावर तिने संयम गमावला नाही. त्यामुळेच तपास यंत्रणांचा संशय आणखी बळावला आहे. कारण तपास यंत्रणा जेव्हा चौकशी करतात तेव्हा व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या खचतो. मात्र, सीमा हैदर ही अत्यंत संयमाने सर्व परिस्थती हाताळताना दिसते.