फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; अपघातात 6 कामगारांचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)
तामिळनाडूमध्ये फटाके बनवणाऱ्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला. तसेच 30 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक तपासानुसार केमिकल मिसळत असताना हा स्फोट झाला. स्फोटात किमान एक खोली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या खोलीतच मजूर काम करत होते. पोलीस आणि इतर संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्फोट इतका जोरदार होता की एक संपूर्ण खोली उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
तामिळनाडूच्या या कारखान्यात फटाके बनवणारे 80 हून अधिक कामगार कारखान्यात काम करत होते. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याच्या चार खोल्या पूर्णपणे कोसळल्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते सर्व कारखान्यातील कामगारांचे होते. इतर तपास सुरू करण्यात आले.
#WATCH | Tamil Nadu: Six people died in an explosion that took place at a firecracker manufacturing factory in the Sattur area of Virudhunagar district. More details awaited: Prem Anand Sinha, South zone IGP pic.twitter.com/iEBSl7j6vX
— ANI (@ANI) January 4, 2025
वेलमुरुगन (५४) आणि कामराज (५४) कुरुंथमदंताई, नागराज (३७) चेट्टीकुरिची, मीनाची सुंदरम (४६), अरुप्पुकोट्टई, शिवकुमार (५६) कुरुंथमदंताई आणि कन्नन (५४) वीररापट्टी अशी मृतांची नावे आहेत. स्फोटाच्या वेळी सर्वजण प्रभावित भागात काम करत होते. याशिवाय एका गंभीर जखमीला विरुधुनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
विरुधुनगर, विशेषत: शिवकाशी, हे तामिळनाडूची फटाक्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते, राज्यातील बहुतेक फटाके कारखाने तेथे आहेत. 300 हून अधिक कारखाने विरुधुनगर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये अशा प्रकारचे फटाके तयार करतात. फटाका उद्योग विरुधुनगरमधील 1,150 कारखान्यांमध्ये अंदाजे चार लाख कामगारांना रोजगार देतो, भारताच्या फटाक्यांच्या उत्पादनात एकट्या शिवकाशीचा वाटा 70 टक्के आहे. 2024 मध्ये, विरुधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये 17 अपघात झाले, परिणामी 54 मृत्यू झाले.
यापूर्वी तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यांना लागलेल्या आगीच्या दोन घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. पहिली घटना रंगापालयम भागातील आहे. फटाक्यांच्या नमुन्याच्या तपासणीदरम्यान हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.