एअर इंडियाचे विमान कोसळताच शेअर बाजारात भूकंप, टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले
२४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान आज ७०० फूटांवरून कोसळलं. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. दरम्यान घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमींना हास्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये भूकंप आला असून टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले आहेत. टाटा समूहाच्या या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
TCS: १% पेक्षा जास्त घसरण
टाटा स्टील: शेअर्स ३% ने घसरले
टाटा पॉवर: २.५% ने घसरण
टाटा एलेक्ससी: २% पेक्षा जास्त तोटा
टाटा कम्युनिकेशन्स: १% पेक्षा जास्त घसरण
टाटा मोटर्स: ३% पेक्षा जास्त घसरण
टाटा केमिकल्स: ३% ने घसरण
टाटा कंझ्युमर: २% पेक्षा जास्त घसरण
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन: सुमारे ४% ने घसरण
इंडियन हॉटेल्स: २% पेक्षा जास्त
सर्वात मोठी घसरण टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा कंझ्युमर, टाटा इन्व्हेस्टमेंट आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. अशा घटना गुंतवणूकदारांच्या मनात भीती आणि गोंधळ निर्माण करतात, ज्यामुळे समूहाशी संबंधित सर्व कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव येतो. टाटाचे नाव एअर इंडियाशी जोडल्यामुळे शेअर्स कोसळल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
भारतीय शेअर बाजार आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्येही बाजाराच्या सुरुवातीला वाढ झाली होती, मात्र नंतर त्यामध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स जवळजवळ १,००० अंकांनी घसरला, तर निफ्टी २४,८५० अंकावर होता. दुपारी २.१५ च्या सुमारास, सेन्सेक्स ८१,५३१.९३ वर व्यवहार करत होता, मात्र दुपारनंतर सुमारे ९८३.२१ अंकांनी घसरला. त्याच वेळी, निफ्टी ३०१.१५ अंकांनी घसरून २४,८४०.२५ वर आला आहे. निफ्टीवर इन्फोसिस, इटरनल, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.
अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याचे वृत्त आहे. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. या घटनेत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती नाही. तथापि, काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.