अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटवर ठाकरे गट खासदार प्रियांका चतुर्वैदींनी मत मांडले (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे बजेट सादर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच बजेट आहे. त्यामुळे मोदी सरकार सर्वसामान्य लोकांना कोणते सरप्राईज देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी नवीन आयकर करप्रणाली जाहीर केली असून यामध्ये त्यांनी 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील कौतुक केले आहे.
नोकरदार वर्ग आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकरातून पूर्णपणे सूट देण्याची घोषणा केली. यामुळे संसदेमध्ये देखील सत्ताधारी खासदारांनी जोरदार स्वागत केले. त्याचबरोबर आता विरोधी नेत्यांनी देखील भाजप सरकारच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. या घोषणेचे विरोधी पक्ष शिवसेना ठाकरे गटाने स्वागत केले. ही नवीन करप्रणाली यावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. याबाबत आमदार रोहित पवार यांनी देखील ट्वीट केले होते. आता आयकर प्रणाली जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्ष शिवसेना (यूबीटी) च्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “गेल्या 10 वर्षांपासून मध्यमवर्गीय या बहिऱ्या आणि मुक्या सरकारकडून दिलासा मागत आहेत आणि आज त्यांची मागणी ऐकली गेली आहे. लोकसभेतील 240 (भाजपच्या जागा) च्या सत्तेमुळेच अहंकारी सरकारला त्यांचा आवाज ऐकण्यास भाग पाडले आहे. या घोषणेमुळे जनतेला दिलासा मिळेल. उत्पन्न वाढत नव्हते, बचत होत नव्हती, खर्च सतत वाढत होता. आता आयकरात सूट मिळाल्याने मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे, मी त्याचे स्वागत करते,” असे मत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले आहे.
बिहारच्या घोषणेवर प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
अर्थसंकल्पात बिहारबाबत अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याबद्दल ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “बिहारमधील लोक म्हणत असतील की निवडणुका दरवर्षी याव्यात, निवडणुका दरवर्षी होतील, तरच अर्थसंकल्पावर लक्ष केंद्रित केले जाईल” अशा शब्दांत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर
बिहारसाठी या मोठ्या घोषणा करण्यात आल्या
अर्थसंकल्पात बिहारसाठी राज्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मखाना बोर्ड स्थापन करणे, ग्रीनफिल्ड विमानतळांचे बांधकाम, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेची स्थापना, पश्चिम कोसी कालव्यासाठी आर्थिक मदत आणि आयआयटी पटनाच्या क्षमतेचा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे बिहारमधील नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.